भुसावळात भरदिवसा दरोडा : प्राचार्य पत्नी गंभीर जखमी

0

भुसावळातील श्री संत गाडगेबाबा इंजिनिअरींग कॉलेज क्वार्टर परीसरातील थरार ः दरोडेखोराच्या हल्ल्यात मोलकरीण झाली जखमी

भुसावळ – शहरातील नामांकि श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.आर.पी.सिंग यांच्या झेडटीसी भागातील शांतीधाम परीसरातील निवासस्थानी शनिवारी भरदिवसा सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र प्राचार्य पत्नीसह घरातील मोलकरणीने प्रतिकार केल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने गंभीर प्रहार केल्याची घटना उघडकीस आल्याने शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने प्राचार्य पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत तर त्यांच्याकडे कामास असलेल्या कर्मचारी (मोलकरीण) वरदेखील चोरट्यांनी हल्ला केल्याने त्यांच्यावर नशिराबाद येथील गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्यंत विरळ वस्ती असलेल्या भागात झालेल्या धाडसी दरोड्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. प्राचार्य पत्नी या शुद्धीवर नसल्याने नेमका काय ऐवज चोरीला गेला वा नेमकी घटना कशी घडली? याचा त्यांचा जवाबानंतरच उलगडा होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. जबरी चोरीच्या प्रयत्नानंतर जळगाव येथून श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले

प्राचार्य महाविद्यालयात जाताच चोरट्यांनी साधला डाव
श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी.सिंग हे कुटुंबासह झेडटीसी भागातील क्वार्टरमध्ये कुटुंबासह राहतात. ते शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महाविद्यालयात गेले असता 25 ते 27 वयोगटातील व पाच फूट पाच इंच उंचीच्या तरुणाने सिंग यांचे घरात अनधिकृतरीत्या शिरण्याचा प्रयत्न केला मात्र प्राचार्य पत्नी शकुंतला राजेंद्र सिंग त्यास प्रतिकार केल्याने आरोपीने सोबत आणलेल्या लोखंडी हातोडीतून त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने रक्तस्त्राव झाल्याने शकुंतला या जागीच बेशुद्ध झाल्या. गोदरेज कपाटातून चोरटा रोकड व दागिण्यांचा ऐवज लांबवण्याचा प्रयत्न करीत असतानाच सिंग यांच्याकडे कर्मचारी म्हणून (मोलकरीण) कामास असलेल्या रत्ना संतोष तायडे (फेकरी, ता.भुसावळ, ह.मु.श्री संत गाडगेबाबा इंजिनिअरींग कॉलेज क्वार्टर, झेडटीसी, भुसावळ) आल्या व त्यांनी सिंग यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरडा-ओरड सुरू करताच चोरट्याने तायडे यांच्या डोक्यातही लोखंडी हातोडी हल्ला चढवला. चोरीचे बिंग फुटू नये यासाठी चोरट्याने लागलीच घरातून धुम ठोकली. चोरट्याने नेमका काय ऐवज लांबवाला? हे मात्र शकुंतला सिंग यांच्या जवाबानंतरच कळणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सकाळी 11 वाजता घडलेल्या या घटनेनंतर तायडे यांनी प्राचार्य यांना भ्रमणध्वनीवरून घटना कळवल्यानंतर तालुका पोलिसांना माहिती कळवण्यात आले. घटनास्थळी एकच चोरटा असल्याचे सांगितले जात असलेतरी त्याचे आणखी काही साथीदार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिसांची घटनास्थळी धाव
शहरात भर दिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण हजारे, उपनिरीक्षक सुरेश वैद्य, उपनिरीक्षक सचिन खामगड, चालक सुनील चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जळगाव येथून श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी रत्ना तायडे यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अरुण हजारे करीत आहेत.