भुसावळ प्रतिनिधी l
चारचाकीतून आलेल्या हायप्रोफाईल चोरट्यांनी अत्यंत वर्दळीच्या व उच्चभ्रू परिसरात म्हणून गणल्या जाणाऱ्या तापी नगरातील अपार्टमेंटमधील बंद घरात सिनेस्टाईल घरफोडी करीत सुमारे एक लाखांचे दागिने लांबवल्याची घटना गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली भुसावळातील तापी नगरातील चोपडे बिल्डींगनजीक शालिन व्हिला या अपार्टमेंटमध्ये सदगुरु पेट्रोल पंपाचे मॅनेजर हरीष किशन मदनानी हे पत्नी रेखा यांच्यासह वास्तव्यास आहेत. हरीष मदनानी हे गुरुवारी अकोला येथे कामानिमित्त गेल्याने पत्नी रेखा या घरी एकट्याच होत्या व दात दुखत असल्याने दुपारी ०१ वाजेच्या सुमारास तापी नगर रिक्षा स्टॉपजवळील श्री डेंटल दवाखान्यात प्लॅटला कुलूप लावून गेल्या. पाळत ठेवून असलेल्या व पॉश कपडे परीधान केलेल्या चार चोरट्यांनी स्वीप्टद्वारे दाखल होत एकाने चारचाकी सुरू ठेवत पहारा दिला तर दुसऱ्याने शालिन व्हिलातील जिन्यात पहारा दिला तर अन्य दोघांनी प्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करीत तीन तोळे वजनाच्या व ७५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या 12 हजार 500 रुपये किंमतीचे पाच ग्रॅमचे टॉप्स व १२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट असा एक लाखांचा ऐवज लांबवला.सुमारे २० मिनिटात रेखा या दवाखान्यातील काम आटोपून प्लॅटमध्ये परतल्या असता त्यांना दरवाजा उघडा दिसल्याने पती आल्याचे समजून त्या आतमध्ये शिरताच २५ ते ३० वयोगटातील चोरट्यांनी त्यांना धक्का देत पलायन केले. यावेळी त्यांनी ‘चोर चोर’ असे ओरडल्याने अपार्टमेंटमधील नागरीक बाहेर आले व त्यांनीदेखील चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच २५ ते ३० वयोगटातील चारही चोरटे स्वीप्टमधून भरधाव वेगाने पसार झाले.
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघन व पोलिसांनी घटनास्थळी भेट देत नेमका प्रकार जाणून घेतला. या प्रकरणी रेखा मदनानी यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भर दिवसा घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी या परीसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात चारचाकीत जाणारे चार चोरटे कैद झाले असून वाहनाच्या नंबरप्लेट आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलीस पथकाने नशिराबाद, फेकरी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले असून गांधी पुतळा तसेच यावल रोड भागातूनही सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे