भुसावळ : लग्नासाठी भुसावळात आलेल्या बुलढाण्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला डंपरने कट मारून झालेल्या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता वाजता खडका चौफुलीवर हा अपघात झाला. या अपघातात चंद्रकांत जगन्नाथ वराडे (63) व संध्या चंद्रकांत वराडे (56) यांचा जागीच मृत्यू झाला.
डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू
बुलढाण्यातील वराडे दाम्पत्य भुसावळातील गडकरी नगरात नातेवाईकांकडील लग्न समारंभासाठी आले होते. गुरुवारी भुसावळातील देना नगरातील नातेवाईकांकडे मुक्काम केल्यानंतर दाम्पत्य दुचाकी (एम.एच.28 ए.एल.6671) ने खडका रोडने गडकरी नगराकडे येण्यासाठी निघाले असता खडका चौफुलीवर डंपर (एम.एच.19 झेड.3192) ने कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर घसरली व दाम्पत्यही रस्त्यावर फेकले गेल्यानंतर दाम्पत्याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच पोलिस उपअधीक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्यांनी घटनास्थही धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डंपर चालक महेद्र कोळी (रा.
भोरटेक, ता.यावल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला असून त्यास अटक करण्यात आली आहे शिवाय डंपरही जप्त करण्यात आला आहे.