भुसावळात भर दिवसा बंद घर फोडले

भुसावळ : घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे 65 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना शहरातील खडका रोडवरील लक्ष्मी नगरात गुरुवार, 30 सप्टेंबर रोजी भर दिवसा घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा घरफोडी झाल्याने शहरात खळबळ
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात उषाबाई गंभीरराव मोरे (60, लक्ष्मीनगर, खडका रोड, माती ग्राऊंडजवळ, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. मोरे या गुरुवारी दुपारी बाहेर कामानिमित्त गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत कपाटातील तीन हजारांच्या सोन्याच्या फुल्या, सात हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल, चार हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स, पंधरा हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, पंधरा हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या दोन अंगठ्या, दोन हजार रुपये किंमतीच्या दोन चांदीच्या चैन, तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण, चार हजार रुपये किंमतीचे चांदीचे पाच लक्ष्मीचे शिक्के व 25 हजारांची रोकड मिळून एकूण 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. घरफोडीची माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला व सहकार्‍यांनी यांनी भेट देवून पाहणी केली. तपास हवालदार जयेंद्र पगारे व नाईक निलेश चौधरी करीत आहेत.