भुसावळात भाजपाला गड राखण्याचे आव्हान !

0

‘शहर विकासाचा’ मुद्दा ठरणार कळीचा : सत्तेच्या सारीपाठात लेवा पाटीदार समाजच ‘किंगमेकर’ : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार गणित

भुसावळ (गणेश वाघ)- भुसावळ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच काँग्रेससह राष्ट्रवादीने तसेच एमआयएम व वंचित बहुजन आघाडीतर्फे स्वतंत्रपणेे उमेदवार उभे केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशी होईल यात शंकाच नाही. सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या आमदार संजय सावकारे यांना ‘भाजपाचा गड’ राखण्यासाठी या निवडणुकीत कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. स्थानिक उमेदवाराप्रमाणेच ‘शहर विकासाचा मुद्दा’ या निवडणुकीत कळीचा ठरणार आहे. इच्छूकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्याने पावसाळ्यातही निवडणूक फिव्हर वाढला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची युती असलीतरी ऐनवेळी जागा कुणाकडे जाते? यावरही निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.

भाजपाला गड राखण्याचे आव्हान !
भुसावळ तालुक्यातील 52 गावांपैकी तब्बल 39 ग्रामपंचायतीसह भुसावळ पालिकेतही भाजपाची असलेली एकहाती सत्ता, तीन पंचायत समिती सदस्यांसह एक जि.प.सदस्य व यासोबतच भाजपाच्या संघटनासोबतच स्ट्राँग असलेली बुथ रचना या भाजपाच्या जमेच्या बाजू असल्यातरी भुसावळातील अमृत योजनेमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था, शहरासह तालुक्यातील बिकट बनलेला पाणीप्रश्‍न, तालुक्यातील 90 टक्के भाग ड्रायझोन असून बागायती, सिंचनाखालील अल्प असलेले क्षेत्र, एमआयडीसीचा खुंटलेला विकास, भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळण्याचा प्रलंबित प्रश्न, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी कळीचे मुद्दे विधानसभा निवडणुकीत विरोधक उपस्थित करून भाजपाची डोकेदुखी वाढवू शकतात. जागा वाटपावरून भाजपा-सेना युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे ऐनवेळी युती तुटल्यास पुन्हा समीकरणे बदलतील यात शंकाच नाही. भाजपामधून विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासह डॉ.मधू मानवतकर, लक्ष्मण सोयंके यांच्यासह सहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. तिकीट कुणाला मिळणार ? याबाबत सर्वांनाच आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदारांनाच तिकीट मिळेल, असा कार्यकर्त्यांना विश्‍वास असून ते कामालादेखील लागले आहेत. सोयंके यांनी पक्षनिष्ठेच्या जोरावर तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत तर डॉ.मानवतकरही व्हाया जामनेर व नागपूरवरून तिकीट आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपा उमेदवाराला विरोधकांशी दोन हात करताना पक्षातील अंतर्गत गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘एकला चलो रे…!’
भुसावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीच्या वाटेला असलीतरी काँग्रेसलाच जागा सुटेल या आशेवर संजय ब्राह्मणे यांनी दावेदारी करीत मतदारांशी संपर्क अभियान सुरू केले आहे. गत निवडणुकीत सेनेतून पराभूत झालेल्या ब्राह्मणेंनी आता काँग्रेसमधून उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांना मिळालेल्या 47 हजारांच्या एकगठ्ठा मतदानामुळे ब्राह्मणेंचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. काँग्रेससोबत असलेल्या पारंपरीक मतदारांसह अन्य मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीचे सदस्यही नसलेल्या मनीष ट्रॅव्हल्सचे संचालक सतीश घुले यांना तालुकाध्यक्षपदाची जवाबदारी देत प्रकाशझोतात आणून तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे संकेतही दिले आहेत तर ऐनवेळी घुले यांच्या सौभाग्यवतींनाही पुढे केले जावू शकते, अशी चर्चा आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत अ‍ॅड.राजेश झाल्टे, संजय ब्राह्मणे या बुद्धीस्ट समाजाच्या उमेदवारांचा झालेल्या पराभवानंतर चौधरींनी चर्मकार समाजातील घुले यांना उमेदवारी जाहीर करून नवीन राजकीय समीकरणांची मांडणी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवारांची घोषणा केली असलीतरी ऐनवेळी जागा नेमक्या कोणत्या पक्षाला सुटते ? यानंतर पुढील अनेक राजकीय समीकरणेदेखील अवलंबून असणार आहेत.

संतोष चौधरींच्या एन्ट्रीने भाजपाची वाढली डोकेदुखी
गेल्या काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर माजी आमदार संतोष चौधरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. कुठलेही राजकीय पाठबळ नसताना त्यांनी एकट्याच्या जोरावर पालिकेत 19 नगरसेवक निवडून आणल्याने आजही त्यांचे राजकारणातील वलय टाळण्याजोगे नाही. 2009 मध्ये मतदार फेररचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी 2009 च्या निवडणुकीत संजय सावकारे यांना निवडून आणले मात्र मध्यंतरीच्या काळात ‘पुलाखालून बरेच पाणी वाहिल्यानंतर’ त्यावेळी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या संजय सावकारे यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली व माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या मदतीने पुन्हा ही जागा जिंकली. भुसावळच्याच जागेवरून राज्यातील शिवसेना-भाजपची युती तुटली, अशीही चर्चा आजही होताना दिसते. सावकारे-चौधरींमधील ‘सख्ख्य’ भुसावळकरांना ठावूक आहे तर चौधरींचे आगामी राजकीय डावपेच काय असतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. चौधरींची एन्ट्री मात्र भाजपासाठी निश्‍चित डोकेदुखी ठरू शकते, असे जाणकारांना वाटते.

डॉ.मधू मानवतकर भाजपाच्या प्रबळ दावेदार
भुसावळातील प्रथितयश डॉ.राजेश मानवतकर यांच्या पत्नी डॉ.मधू मानवतकरदेखील प्रबळ दावेदार व भाजपाच्या इच्छूक उमेदवार आहेत. भाजपाकडून त्यांनी जागेची मागणी केली असून तशी व्हाया ‘जामनेर’ व ‘नागपूर’हून फिल्डींगही लावली आहे मात्र भाजपाने उमेदवारी न दिल्यास ‘त्या’ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असतील, अशीदेखील चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीसह अनेकांनी त्यांना उमेदवारीची ऑफरही दिली आहे. रुग्णसेवेचा अविरत वसा व प्रज्ञासूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ.मानवतकर भुसावळसह तालुकावासीयांना ठावूक आहेत. भाजपाने काही कारणास्तव त्यांना तिकीट न दिल्यास ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील, असेदेखील राजकीय समीक्षकांना वाटते. वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची युती आता अधिकृतरीत्या तुटल्याने दोघाही पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार उभे केले जातील त्यामुळे मत विभाजनाचा फायदा नेमका कुणाला व कसा होईल? हे निवडणुकीअंतीच कळणार आहे. माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, माजी नगरसेवक जगन सोनवणे, विनोद सोनवणे यांच्यासह अनेक जण उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

निवडणुकीत लेवा पाटील समाज ‘किंगमेकर’
1962 पासून झालेल्या 13 निवडणुकांमध्ये लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवारांनी तब्बल नऊ वेळा बाजी मारली तर माजी पालकमंत्री संजय सावकारे, माजी आमदार संतोष चौधरी आणि मो.यासीन बागवान यांच्या रूपाने केवळ तीन लेवा समाजाबाहेरील उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. लेवा पाटीदार समाजाचे या मतदारसंघात 65 हजार 372 मतदान आहे. त्यात एकूण मतदानापैकी 80 ते 90 टक्के मतदान एकगठ्ठा होते त्यामुळे ज्या उमेदवाराकडे लेवा समाज त्याचा विजय निश्‍चित, असे गणित आहे. या निवडणुकीत लेवा समाज कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी असेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.