भुसावळ : शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे सत्ताधारी व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने जामनेर रोडवरील मान रेसिडेंन्सीजवळ बुधवारी सकाळी तुंबलेल्या पाण्यात कागदाच्या होडी सोडून भाजयुमोने आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर जामनेर रोडवरील मान रेसीडेन्सीजवळील मोठ-मोठ्या खड्ड्यांमध्ये गुरुवारी मुरूम टाकण्यात आला तर अन्य जामनेर रोडवरील खड्डे शुक्रवारपासून बुजवण्यात येणार असल्याची माहिती नूतन उपनगराध्यक्षा सोनी संतोष बारसे यांनी दिली. दरम्यान, खड्डेमय रस्त्यांना उशीरा का असेना मुरूमाला मुलामा दिला जात असल्याने त्रस्त वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भाजयुमोच्या आंदोलनाने सत्ताधार्यांना जाग
शहरातील जामनेर रोडसह व प्रमुख रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून मुरूमाचे टेंडर मंजूर झाल्यानंतरही पालिका प्रशासनासह सत्ताधार्यांकडून कुठलीही हालचाल होत नसल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या पालिका प्रशासन व सत्ताधार्यांना जागी करण्यासाठी भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी खड्डेमय रस्त्यांमध्ये कागदाची होडी सोडून सत्ताधार्यांना घरचा अहेर देत लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत गुरुवारपासून जामनेर रोडवरील खड्डे बुजवण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी उपनगराध्यक्षा सोनी संतोष बारसे, माजी नगरसेवक संतोष बारसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे, पालिकचे अभियंता रवींद्र बाविस्कर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, शुक्रवारपासून बसस्थानकासह जामनेर रोडवरील अन्य खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक बारसे यांनी सांगितले.