आरोपी जाळ्यात ; कौटुंबिक कारणावरून चाकूने केली हत्या
भुसावळ (गणेश वाघ)– शहरातील मोहम्मदी नगरात कौटुंटिक कारणावरून सख्ख्या भावानेच चाकूचे सपासप वार करून भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
भावानेच संपवले भावाला
शहरातील मोहम्मदी नगरातील रहिवासी असलेल्या व गवंडी काम करीत असलेल्या जावेदअली गुलामअली (29) यांची त्यांचा लहान भाऊ व व्यवसायाने रीक्षा चालक असलेल्या वाहेदअली गुलामअली (27) याने चाकूचे निर्घुण वार करून हत्या केली. तत्पूर्वी गंभीर जखमी अवस्थेतील जावेदअली यांना कोणार्क रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. समजलेल्या माहितीनुसार, दोघा भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रॉपर्टीचे तसेच अन्य काही वाद सुरू होते तर गुरुवारी पुन्हा भांडण होवून वाद विकोपाला गेल्याने वाहेदअलीने भावाला चाकू मारला असावा, अशी शक्यता आहे.