In Bhusawal, 148 mandals Formally Established Sri भुसावळ : कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर यंदाच्या गणेशोत्सवात निर्बंध उठल्याने भाविकांनी मोठ्या जल्लोषात श्रींची स्थापना केली. शहरातील 148 गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी ढोल-ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात श्रींची दिवसभरात स्थापना केली. यंदा 18 फुटांपेक्षा उंच मूर्तीचा ट्रेंड शहरात दिसून आला. यंदा 22 मंडळांची संख्या सुध्दा वाढली आहे.शहरातील मुख्य बाजारपेठेत गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, मोदक, केळीची खांब, आंब्याची पाने आदी खरेदीच्या माध्यमातून बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली.
भाविकांच्या गर्दीने फुलली बाजारपेठ
बुधवारी सकाळी आठपासूनच बाजारपेठेत पूजेचे साहित्य खरेदीला गर्दी झाली. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. विविध साहित्य घेण्यासोबतच आरास करण्यासाठी साहित्याची खरेदी झाली तसेच लाईटींग, विविध रंगाचे बल्ब, रंगीत फिरणारे बल्ब, आरास करण्यासाठी लागणारे पडदे यांची खरेदी करण्यात आली. सायंकाळपर्यत अनेक भाविकांनी गणेश मुर्ती खरेदी करून घरी नेल्यात.
बियाणी चेंबर्समध्ये विघ्नहर्त्याची विधीपूर्वक स्थापना
भुसावळ : शहरातील बियाणी चेंबर्समध्ये बुधवार, 31 रोजी विघ्नहर्त्या गणरायाची विधीवत सालाबादाप्रमाणे स्थापना करण्यात आली. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी यांनी सौभाग्यवती तथा बियाणी गु्रपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी सोबत विधीवत पूजन केले. बाप्पाच्या स्थापनेने बियाणी चेंबर्समध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बियाणी चेंबर्स परीसरातील भाविकांनी यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पांचे स्वागत केले. पर्यावरणपूरक गणेशाची बियाणी चेंबर्समध्ये स्थापना करण्यात आली. प्रसंगी बियाणी ग्रुपचे उपाध्यक्ष विनोद बियाणी, संचालक रोनक बियाणी, पियुष बियाणी, गोपाळ ठाकूर, राजू मोरे, जिवीका ठाकूरसह बियाणी चेंबर्सचे कर्मचारी उपस्थित होते. बियाणी चेंबर्समध्ये गेल्या 27 वर्षांपासून बाप्पांची विधीवत स्थापना करण्यात येत आहे.
महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ
भुसावळ : महाराणा प्रताप विद्यालयात श्रींची स्थापना करण्यात आली.विद्यालयाचे पर्यवेक्षक घोडके व त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते श्री गणेशाची विधीवत स्थापना करण्यात आली. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सोनुभाऊ मांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
अॅड.रोहिणी खडसेंकडे गणरायाची स्थापना
मुक्ताईनगर : राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर व डॉ.प्रांजल खेवलकर यांनी बुधवारी आपल्या निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचे विधीवत पूजन करून स्थापना केली. यावेळी आमदार एकनाथराव खडसे आणि जिल्हा दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे आणि परीवारातील सदस्य उपस्थित होते. कोथळी येथे खासदार रक्षा खडसे यांनी गणरायाची स्थापना केली.