आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश : भुसावळातील वसंत टॉकीज चौकातून खोदकामाला सुरुवात
भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरील भुमीगत वीज वाहिनीच्या कामाला मंगळवारपासून सुरूवात झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त होत आहे. शहरातील तापी रोडवरील वसंत टॉकीज चौकांतून महावितरण कंपनीने खोदकाम सुरू केले आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून हे काम रेंगाळले होते.
आमदारांच्या पाठपुराव्याला यश
शहरात गेल्या पाच वर्षांपूर्वी आरएपीडीआरपी योजनेतून मिरवणूक मार्गावरील भूमीगत वीज वाहिनीच्या कामाला मंजरी मिळाली तर या कामासाठी मात्र जलवाहिनी जीर्ण असल्याने पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली होती. यानंतर आरएपीडीआरपी योजना बंद झाल्याने अन्य योजनांमधून या कामाला पुन्हा आमदार सावकारे यांनी मंजुरी मिळवली. शहरातील स्व.मोटूमल चांदवाणी चौक, ब्राह्मण संघ न्यू एरीया वॉर्ड, नृसिंह मंदिर, अप्सरा चौक, मरीमाता मंदिर, मोठी मशीद, सराफ बाजार, अमर स्टोअर्सचा भाग, स्टेशन रोड, आठवडे बाजार पोलिस ठाणे, हंबर्डीकर चौक ते तापी रोडवरील वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौकापर्यंत हे काम केले जाणार होते. गेल्या चार महिन्यांपूर्वी या कामाला जामनेर रोडवरील ब्राह्मण संघाच्या वाय पॉईंटपासून सुरवात झाली होती मात्र हे काम थांबले होते. यानंतर आमदार सावकारे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी तत्काळ हे काम सुरु करण्याचे निर्देश दिले होते.
या भागात टाकली जाणार भूमिगत वाहिनी
वीज महावितरण कंपनीने आता पालिकेच्या सर्व ना हरकत व इतर परवानगी घेवून कामाला सुरवात केली असून मंगळवारपासून वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौकातून या कामाला सुरवात झाली. शहरातील स्व. मोटूमल चांदवाणी चौक, ब्राह्मण संघ न्यु एरीया वॉर्ड, नृसिंह मंदिर, अप्सरा चौक, मरिमाता मंदिर, मोठी मशीद, सराफ बाजार, अमर स्टोअर्सचा भाग, स्टेशन रोड, आठवडे बाजार पोलिस ठाणे, हंबर्डीकर चौक या मिरवणूक मार्गावर ही भूमिगत वीज वाहिनी टाकली जाणार आहे.