भुसावळात आमदार संजय सावकारे यांना समाजबांधवांनी दिले निवेदन
भुसावळ : मराठा समाजातील मुला-मुलींची चालू आर्थिक वर्षापासून फी परतावा राज्य सरकारकडून मिळावा, त्याच बरोबर केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले, त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा, सर्वांत महत्वाचे महाराष्ट्र सरकारकडून येणार्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतुद करावी तसेच मराठा समाज आरक्षणावरील न्यायालयीन स्थगिती तत्काळ उठवावी आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे सोमवार, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आमदार संजय सावकारे यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन आमदारांना देण्यात आले.
तर आंदोलन छेडण्याचा इशारा
आमदारांना दिलेल्या निवेदनानुसार, राज्यातील शेतकर्यांची कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबाचे पूर्नवसन करावे, मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, मराठा आरक्षण आंदोलनात बलीदान दिलेल्या कुटूंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे तसेच राज्यातील शेतकर्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर राज्यातील गड व किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतुद करावी, हाथरस येथील पिडीत भगिनीला त्वरीत न्याय मिळावा तसेच दोषींना शिक्षेची अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठीचे निवेदन आमदार संजय सावकारे यांना देण्यात आले. मराठा समाजाची शैक्षणिक व नोकरीमध्ये असलेली आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत सकल मराठा समाजातर्फे लढा सुरूच राहणार आहे. असा इशाराही यावेळी पदाधिकार्यांनी दिला.
यांची होती उपस्थिती
किरण पाटील, दीपक मराठे, पंकज पाटील, अनिल पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पवन मराठे, गिरीष पवार, प्रमोद पाटील, किशोर पाटील, एकनाथ धांडे, उमेश पाटील, वासुदेव चौधरी, अतुल चौधरी, विकास चौधरी, पंकज हिंगणे, किरण शिंदे आदींसह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाठपुरावा करणार : आमदार
आरक्षणाच्या प्रश्नी निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही शासनाकडे निश्चितच पाठपुरावा करुन समाजबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्चासन यावेळी आमदार संजय सावकारे यांनी आंदोलकांना देत मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी न्यायीक व शांततेच्या मार्गाने आंदोलन केले असल्याचेही ते म्हणाले.