भुसावळात महसूल कर्मचार्‍यांची निदर्शने : कामकाज ठप्पने नागरीकांचे हाल

भुसावळ : महसूल विभागात सहायकांची रीक्त पदे तातडीने भरावीत, पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमार्यादित पार पाडावी, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरून 4600 रुपये करावा, 27 नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी, प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे, पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी या मागण्यांसाठी महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. भुसावळ तालुका महसूल कर्मचारी संघटनेनेही यात सहभाग नोंदवल्याने शहरातील प्रांताधिकारी व तहसील कार्यालयातील दाखले वितरण, रेशनकार्ड लिकींगसह सर्व कामकाम सोमवारी ठप्प झाल्याने कामे घेवून आलेल्यांना रीकाम्या हाती परतावे लागले.

यांचा संपात सहभाग
संपात नायब तहसीलदार एस.आर.घुले, अव्वल कारकुन डी.एच.बोरसे, सहाय्यक सुदाम नागरे, पी.व्ही.वडनेरे, एस.आर.सहारे, रुपाली गुरव, एस.बी. तिवारी, जे.व्ही.तायडे, बी.एन.शिरसाठ आदींसह महसूल कर्मचार्‍यांनी संपात सहभाग नोंदवला. काम बंद करुन तहसील कार्यालयाबाहेर कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. दरम्यान, संपामुळे रेशन कार्ड आधारला लिंक करणे, उत्पन्नाचे दाखले, हयातीचे दाखले, क्रिमीलेअर सर्टीफिकेट, महसूलचे विविध परवाने, जातीचे दाखले, पोलिसांकडून गुन्हेगारांवर होणार्‍या प्रतिबंधक कारवाई आदी कामकाज ठप्प झाले आहे.