भुसावळात महामानवाच्या जयंतीनिमित्त निघणार 29 मिरवणुका

0

पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त ; जयंतीनिमित्त उत्साह

भुसावळ- घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर सजले असून शहरातील विविध भागातून मिरवणुका निघणार आहेत. रविवारी शहरातील तब्ब्ल 29 मिरवणुका शिस्तबद्ध पद्धत्तीने काढण्यात येत असून शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 18 तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नऊ अश्या 27 मिरवणुका निघतील.

15 मंडळे सहभागी होतील मिरवणुकीत
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 18 मिरवणुका निघणार असून त्यातील 15 मंडळांच्या मिरवणुका या मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील. जुन्या पालिका इमारतीजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुका काढण्यात येणार आहेत. शहरातील म्हाडा कॉलनी, रमाई आंबेडकर नगर, सतारा फाईल, कवाडे नगर, राहूल नगर, समता नगर, डॉ. आंबेडकर नगर, दादासाहेब रूपवते नगर, चांदमारी चाळ, कंडारी, चाळीस बंगला, अशोक नगर, धम्म नगर,गौतम नगर मंडळ, पंचशील नगर, सर्व जयंती उत्सव समिती, नेब कॉलनी, भिमवाडी नगर आदी ठिकाणाहून मिरवणूका काढल्या जाणार आहे. मिरवणुकीत डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर सचित्र देखावे सादर होतील.

जयंती उत्सव समितीतर्फे जय्यत तयारी
भुसावळ जयंती उत्सव समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष राहुल (बाळा) सोनवणे, उपाध्यक्ष गिरीश तायडे, सचिव कुणाल अहिरे यांच्या नेतृत्वात शहर निळ्या ध्वजांनी सजवण्यात आले आहे. 14 ते 20 दरम्यान संपूर्ण सप्ताह भीम सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता अभिवादन सभा होईल तसेच मिरवणुकीतील पदाधिकार्‍यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात येणार आहे.

भीम सप्ताहात विविध उपक्रम
दरम्यान, भीम सप्ताहात 15 रोजी सकाळी 10 वाजता वृक्षारोपण, 16 रोजी रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर, 18 रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, 19 रोजी नेत्रदान संकल्प व नेत्र तपासणी शिबिर, 20 रोजी नगरपालिका रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम होईल. दरम्यान, यंदा समितीतर्फे समाजातील दहा प्रतिकुल परीस्थितीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात येत असून त्यांचा शैक्षणिक खर्च केला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष बाळा सोनवणे व उपाध्यक्ष गिरीश तायडे म्हणाले. समितीला राजू सूर्यवंशी, उल्हास पगारे, जगन सोनवणे, रमेश मकासरे, संतोष बारसे, रवींद्र खरात, रवी सपकाळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे समिती कार्याध्यक्ष बाळा पवार यांनी कळवले आहे.