भुसावळ- लोखंड घेवून जळगावकडे निघालेल्या ट्रॉला चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रॉलामधील लोखंड चालकाच्या कॅबीनमध्ये शिरल्याने चालक जखमी झाल्याची घटना भुसावळ-जळगाव महामार्गावरील वाय पॉईंटवर गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहतूक ठप्प झाल्याने भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, संदीप राजपूत, योगेश जाधव, त्र्यंबक बाविस्कर, चालक सुनील शिंदे, सलीम तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, जखमी चालकाचे नाव मात्र कळू शकले नाही शिवाय शहर पोलिसातही अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
चालकाला जळगावी हलवले
सूत्रांच्या माहितीनुसार ट्रॉला (क्रमांक एन.एल.01 ए.डी.0585) मधून नागालँड येथील चालकाने (नाव, गाव माहित नाही) भुसावळातून लोखंड भरून जळगावच्या दिशेने निघाला असतानाच महामार्गावरील वाय पॉईंटजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नाने चालकाने ब्रेक मारल्याने ट्रॉलामधील लोखंड चालकाच्या कॅबीनबाहेर निघाल्याने दर्शनी भागातील चाका फुटल्या तसेच चालकालाही गंभीर ईजा झाली. अपघातग्रस्त चालकाला तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले तर शहर वाहतूक शाखेने अपघातग्रस्त ट्रॉला बाजूला करीत वाहतूक मोकळी केली. नागालँण्ड येथील चंद्रकुमार मिश्रा यांच्या मालकिचा हा ट्राला असल्याचे समजते.