भुसावळात महाराणा प्रतापांचा पुतळा जप्त : परवानगीविना स्थापना करणार्यांविरोधात गुन्हा
शहरातील महाराणा प्रताप चौकात परवानगीविनाच मध्यरात्री केली स्थापना : अज्ञात कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा
भुसावळ : भुसावळ शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसंत टॉकीजसमोरील महाराणा प्रताप चौकात सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची स्थापना केल्याने शहरात खळबळ उडाली. पुतळा बसवण्यात आल्यानंतर त्याचा सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहर पोलिसांना याची माहिती कळताच पोलीस यंत्रणेने धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेत अज्ञात लोकांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पुतळा स्थापन करण्यात आल्याची वार्ता शहरात पसरताच मोठ्या संख्येने राजपूत समाजबांधवांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी परीस्थिती संयमाने हाताळत गर्दी हटवली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकार उघड
शहरातील वसंत टॉकीजसमोरील नियोजित स्मारकावर दोघा अज्ञात तरुणांनी सोमवारी मध्यरात्री क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचा पीओपी धातूचा पुतळा स्थापन केला व पुतळा स्थापन केल्याची क्लीप काही वेळेत सोशल मिडीयात व्हायरल झाली. याबाबतची माहिती शहर पोलिसांना कळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक संदीप दुणगहू यांच्यासह शहर पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात
महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापन करण्याची रीतसर परवानगी नसल्याने पोलीस उपअधीक्षकांनी पुतळा ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर उपस्थितानी त्यास विरोध केला असता पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी रीतसर जिल्हाधिकार्यांच्या पुतळा स्थापन करणार्या कमेटीची नियमांचे पालन करून परवानगी घ्यावी व नंतरच नियमाने पुतळा स्थापन करावा, अशी भूमिका मांडली. यानंतर पोलिसांनी पुतळा ताब्यात घेत शहर पोलिसात आणला.
तरुणासह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा
जिल्हाधिकार्यांची परवानगी न घेता बेकायदा पुतळा स्थापन केल्याप्रकरणी तसेच कोविड नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी आकाश गणेश पाटील व अज्ञात जमावाविरोधात शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेश बोदडे यांनी संदर्भात फिर्याद दिली. तपास सहा.निरीक्षक संदीप दुणगहू करीत आहेत.