भुसावळात महिला धावपटू धावल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी

भुसावळ : जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार, 8 मार्च रोजी भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या लेडीज विंगतर्फे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात काही महिला सदस्यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून धावायला सुरुवात करून आरपीडी रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरी गेट व तेथून पुन्हा मैदानावर परत असे अंतर धावून भुसावळ शहरातील तमाम महिला वर्गास आरोग्याचा संदेश दिला. यावर्षी कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या उद्रेकामुळे लेडीज इक्वलिटी रन काही काळासाठी स्थगित करण्यात आल्यामुळे शहरातील महिला वर्गात काहीसे नाराजीचे वातावरण होते परंतु आजच्या धावण्यामुळे पुन्हा एकदा आरोग्याप्रती उत्साह संचारल्याचे बघावयास मिळाले.

महिलांसोबत सदस्यही धावले
विशेष म्हणजे महिला एकट्या न धावता त्यांनी कुटुंबातील सदस्यांना देखील धावण्यासाठी प्रेरीत केले. गुलाबी रंगाच्या टी-शर्ट मध्ये धावणार्‍या महिलांना बघून सकाळी फिरायला निघालेल्या नागरीकांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करीत होते. त्यांच्या पाठोपाठ हिरव्या टी-शर्टमध्ये कुटुंबातील सदस्यांचा देखील समावेश होता. सकाळी 5.45 वाजता पुनम भंगाळे यांनी वॉर्म अप व्यायामाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर पहाटे सहा वाजता धावायला सुरुवात झाली. धावल्यानंतर स्ट्रेचिंग करण्यात आले. विशेष म्हणजे आजच्या वार्मअप, धावणे व स्ट्रेचिंग या तिन्ही प्रकारात महिला धावपटू आघाडीवर होत्या व कुटुंबातील पुरुष सदस्यांनी त्यांचे अनुकरण केले. कुटुंबातील महिलांचे सर्व जबाबदार्‍या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. शिवाय तिची कुठल्यातरी कामासाठी सतत धावपळ असते परंतु आज सकाळी ‘ती धावली: परंतु स्वतःच्या आरोग्यासाठी’ अशी पहाट उजाडली, अशी प्रतिक्रिया सरोज शुक्ला यांनी दिली.

धावणे आरोग्यासाठी लाभदायी
धावणे आरोग्यासाठी उत्तम तर आहेच परंतु धावण्यामुळे नियंत्रीत वजन, रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, संतुलित आहार, शांत झोप, पाठीच्या मणक्याचे दुखणे कमी होणे, उत्तम मानसिक स्थिती, तणावरहित जीवन यासारखे असंख्य फायदे आहेत त्यामुळे शहरातील महिला मोठ्या संख्येने धावायला सुरुवात करीत आहेत, असे ममता ठाकूर यांनी सांगितले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर धावण्याआधी व धावल्यानंतर मास्क, शारीरिक अंतर व सॅनिटायझर या त्रीसूत्रीचे तंतोतंत पालन केले परंतु महिलादिनी मैत्रिणींसोबत व कुटुंबासोबत धावण्याचा आनंद अवर्णनीय आहे, असे सोनाली वारके म्हणाल्या.

यांचा उपक्रमात सहभाग
या उपक्रमात पूनम भंगाळे, स्वाती फालक, हर्षा लोखंडे, सुवर्णा पाटील, रीया, संजीवनी लाहोटी, सरोज शुक्ला, ममता ठाकूर, सोनाली वारके, डॉ. चारुलता पाटील, अनिता पाटील, प्रिया पाटील या महिला सदस्यांनी सहभाग नोंदविला. परीवारातील महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रवीण फालक, प्रमोद शुक्ला, डॉ.तुषार पाटील, प्रवीण वारके, राजेंद्र ठाकूर, गोविंदा भंगाले, विलास पाटील, हर्षल लोखंडे, ब्रिजेश लाहोटी, प्रवीण पाटील हे सदस्यदेखील उपस्थित होते.