भुसावळ : महिलेच्या हातातून मोबाईलसह दोन हजारांची रोकड लांबवणार्या भामट्याच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस कोठडीचे हक्क राखून ठेवत न्यायालयीन कोठडीत संशयीत राहुल रघुनाथ पाटील (रा. जामनेर) याची ओळख परेड घेतली असता फिर्यादी महिलेने संशयीतास ओळखले. दरम्यान, अटकेतील आरोपीविरोधात शहर व बाजारपेठ पोलिसात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अचानक येत लांबवला मोबाईल
शहरातील सुभाष गॅरेजजवळील रेणूका देवीच्या मंदिराजवळील रहिवासी बालीबाई शिमला चव्हाण या 30 नोव्हेंबर रोजी दुपारी तीनला बाहेर बसल्या असतांना राहुल पाटील हा आला व त्याने महिलेच्या हातातील नऊ हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि दोन हजार रूपये रोख घेऊन पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा महिलेच्या फिर्यादीवरून दाखल झाला होता.
ओळख परेडमध्ये महिलेने संशयीताला ओळखले
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, सहा.पोलिस निरीक्षक संदीप दुणगडू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार इकबाल सय्यद, मोहंमद अली सय्यद, सुपडा पाटील, जाकर शेख यांनी महात्मा फुले नगरातून संशयीत राहूल पाटील याला रात्री 10 च्या सुमारास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करून रात्री 12.15 वाजता अटक केली. त्यास न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीचे हक्क राखून ठेवत ओळख परेडसाठी न्यायालयीन कोठडी घेतली, यात पोलिसांनी ओळख परेड ठेवली असता फिर्यादी महिलेने संशयीत राहूल याला ओळखले. यामुळे पोलिसांनी संशयीत राहूल याला अटक करून न्यायालयात हजर करीत त्यांची पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने संशयीत राहूल याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहा.फौजदार इकबाल सय्यद पुढील तपास करीत आहे.