भुसावळ : अमृत योजना आम्हीच मंजूर करून आणल्याचे श्रेय घेणार्या विरोधकांवर माजी मंत्री खडसे यांनी टिकेची तोफ डागत भुसावळात मांडव घालणारे विरोधकच अधिक असल्याची कोपरखळी मारली. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी अमृत योजना लागू करण्याची बैठक सुरू असतांना त्यावेळचे नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्याशी आपण जळगावसह भुसावळसाठी ही योजना मंजूर करावी, असे सांगितले. त्याचवेळी एका सहकारी मंत्र्याने या शहरांमध्ये भाजपाची सत्ता नाही तरी आपण नाव का सुचवले, असे सांगितल्याची आठवण सांगत मी योजना मंजूर केल्याचे श्रेय घेत नाही मात्र या योजनेसाठी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी मोलाचा पाठपुरावा केल्याचे खडसे म्हणाले. शहराच्या शांततेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही लावावे, अशी अपेक्षा करत खडका गावासाठी 17 कोटींची योजना मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
शहर हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवा -आमदार संजय सावकारे
भुसावळ शहराला लागून मोठ्या प्रमाणावर वाढीव वस्ती झाली असून या नागरीकांना सुविधा मिळण्यासाठी शहर हद्दवाढीचा प्रस्ताव पुन्हा पाठवावा, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. विरोधकांवर टिकेची झोड उठवतांना आता हे योजना मंजुरीचे श्रेय घेत आहेत मात्र यांच्याच काळात नगरोत्थान योजनेच्या व रस्त्यांसाठीचा तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी परत गेला ही आठवणदेखील त्यांनी सांगितली. ज्यांनी निवडून दिले आहे त्यांची कामे व्हावी, अशी आमची भावना असून ज्यांना श्रेय घ्यायचे आहे त्यांनी खुशाल घ्यावे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्र्यांनी केली ट्रामा सेंटरची पाहणी
भुसावळ शहरात मंजूर असलेल्या ट्रामा सेंटरची पालकमंत्र्यांनी जळगाव जाताना पाहणी केली. आमदार सावकारे यांनी त्यांना त्याबाबत माहिती देत त्यासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले. अनेक राजकीय पदाधिकारी प्रसंगी उपस्थित होते.
श्रेयवादात अडकायचे नाही, विकास हाच ध्यास -नगराध्यक्ष रमण भोळे
अमृत योजना विरोधकांनी मंजूर केली असल्याचे ते सांगत असले तरी आम्हाला श्रेयवादात अडकायचे नाही, विकास हाच आमचा ध्यास असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगत आगामी वर्षात शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी रंगकर्मींसाठी नाट्यगृहाची उभारणी करीत असल्याचे ते म्हणाले. गतवर्षी 26 रोजी आम्ही पदभार घेतल्यानंतर त्याच दिवशी मुंबईत अमृतच्या बैठकीला हजेरी लावली, अशी आठवण सांगत पिंप्रीसेकम ऐवजी तापीपात्रात बंधार्याची आम्ही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. पदभार घेवून 10 दिवस उलटत नाही तोच अस्वच्छतेबाबतीत देशात दुसरा क्रमांक आल्याचे गिफ्ट आम्हाला मिळाले मात्र त्यावरही आम्ही मात करत शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले. शौचालयांची विदारक अवस्था पालटवली, तेथे पाण्याची व्यवस्था केली, पालिकेच्या दवाखान्यात औषधे उपलब्ध केली, पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावला, पालिकेच्या मोकळ्या जागा या अतिक्रमणासाठी नव्हे तर जॉगिंग ट्रॅक व ओपन जिमसाठी आम्ही वापरणार असल्याचे त्यांनी सांगत शहरातील रया गेलेल्या उद्यानांची अवस्था पालटवून आणखी नवीन चार प्रशस्त उद्यानांची निर्मिती करीत असल्याची ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
तुकाराम नगरासह मामाजी टॉकीज रोडपासून योजनेचा शुभारंभ -मुख्याधिकारी
पालिकेचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी आपल्या प्रस्तावनेत बहुचर्चित अटल योजनेची माहिती देतांना सांगितले की, पालिकेची पाणीपुरवठा योजना 1958 सालची असून 60 हजार लोकवस्ती गृहीत धरून त्यावेळेस ती सुरू करण्यात आली होती. 1983 मध्ये 20 हजारांनी लोकवस्ती वाढल्याने 12 एमएलडीचा प्लॅन्ट झाला मात्र 2011 पर्यंत एक लाख 87 हजार 421 लोकसंख्या होवूनही कुठलीही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली नाही. अटल योजनेमुळे मात्र आगामी 50 वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. भुयारी गटारी, खुल्या गटारी, रस्ते वाहतूक व पाणी योजना असे योजनेचे टप्पे असून 2018-19 मध्ये भुयारी गटारींच्या कामांना प्रारंभ होईल, असे सांगत 213 कि.मी.ची पाईपलाईन, 79 कोटींचे काम व 11 जलकुंभ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मामाजी टॉकीज रोडची सर्वाधिक दुरावस्था झाल्याने या भागासह तुकाराम नगरातून पाईपलाईन टाकण्याच्या कामास आम्ही प्रारंभ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. धरणाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
कार्यक्रमास यांची उपस्थिती
शोभा नेमाडे, शैलजा नारखेडे, प्रीतमा महाजन, अनिता सोनवणे, प्रतिभा पाटील, लक्ष्मी मकासरे, मीना लोणारी, मेघा वाणी, शैलजा पाटील, मोनी बारसे, कौशल्या बारसे, सिकंदर खान, समाधान पाटील, किशोर पाटील, रवींद्र खरात, महेंद्रसिंग (पिंटू) ठाकुर, जाकीर शेख, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, रमेश मकासरे, राधेश्याम लाहोटी, माजी आमदार निळकंठ फालक, संतोष दाढी, अशोक (आँऊ) चौधरी, हेमराज चौधरी, ईकबाल पहेलवान, ललीत मराठे, दुर्गेश ठाकुर, जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
जलसंपदा मंत्र्यांचा नामोल्लेख डावलला, कार्यक्रम भाजपाने केला हायजॅक
अटल योजनेच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचा आरोप असतांनाच शनिवारच्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आले नसले तरी त्यांचा कुठेही नामोल्लेख निघाला नाही तर शासकीय कार्यक्रम असला तरी हा कार्यक्रम भाजपाचा खाजगी कार्यक्रम होता की काय ? असा प्रश्न पडावा, असे चित्र एकूणच निर्माण करण्यात आले. लाऊड स्पीकर भाजपाचा गवगवा गीत करणारे गीत सादर करण्यात आले. भाजपाच्या काही नाराज नगरसेवकांनी फेटा बांधला मात्र केवळ केशरी रंगाचा याबाबतही चांगलीच चर्चा रंगली.