आरोपींचा वनविभागाने घेतला ताबा ; चौकशीनंतर उलगडणार ‘मांडूळाचे’ रहस्य
भुसावळ- सर्प जातीतील दुर्मीळ असलेल्या मांडूळाची तस्करी करणार्या भुसावळसह यावलमधील तिघांच्या शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मुसक्या आवळल्या असून संशयीतांना अधिक चौकशीकामी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ मांडूळ घेवून संशयीत येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. दरम्यान, गुप्तधनासह काळी जादू व औषधांसाठी दुतोंडी मांडूळाचा वापर केला जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची लाखोंची किंमत असल्याने मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी केली जाते. अटकेतील आरोपींनी नेमका मांडूळ भुसावळात का व कुणासाठी आणला? याची चौकशी केली जात असून त्यानंतर नेमके गुन्ह्याचे रहस्य उलगडणार आहे.
तीन आरोपींच्या आवळल्या मुसक्या
शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद वली सैय्यद, संजय पाटील, सुनील सैंदाणे, भूषण चौधरी, जितेंद्र सोनवणे आदींच्या पथकाने संशयीत आरोपी पंकज विकास कोळी (36, ग्रीन पार्क, भुसावळ), गजानन अनिल सनांसे (22, भालोद, ता.यावल) व आकाश आत्माराम कोळी (22, कोळीवाडा, ता.यावल) यांना ताब्यात घेण्यात आले. संशयीतांच्या ताब्यातून एक किलो 400 ग्रॅम वजनाचा मांडूळ जप्त करण्यात आल्यानंतर वनविभागाला माहिती कळवण्यात आली. रविवारी सकाळी कुर्हे वनपाल भारत नथ्थू पवार व सहकार्यांनी आरोपींसह मांडूळाचा ताबा घेतला. संशयीतांची चौकशी सुरू असून त्यांनी मांडूळ कुठून आणला व तो कुणाला विकला जाणार होता याबाबत माहिती देता येईल, असे आरएफओ आशुतोष बच्छाव म्हणाले.
मांडूळाला आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंचा भाव
मांडूळ हा बिनविषारी साप असून त्याला दुतोंड्या साप म्हणतात. हा साप पहिले सहा महिने एका तोंडाने खातो आणि दुसर्याया तोंडाकडून चालतो. नंतरच्या सहा महिन्यात दुसर्या तोंडाने खातो आणि पहिल्या तोंडाकडून चालतो. इंडोनेशिया, युरोप आणि चायनामध्ये या सापाला अधिक महत्त्व आहे. परंपरागत शक्तीवर्धक आणि कामवासना उत्तेजित करणार्या औषधांमध्ये त्याचा वापर होतो. देशपातळीवर या सापाची किंमत 10 ते 20 लाख असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याची किंमत तीन ते पंचवीस कोटी आहे. या सापाविषयी अनेक अंधश्रद्धा जोपासल्या गेल्या आहेत. हा साप धनशक्तीची देवता असून त्याचे कुबेरासोबत नाते आहे. याच्या दर्शनाने धनशक्तीत वाढ होते, असा गैरसमज असून, तंत्र-मंत्र विद्येतही याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते.