भुसावळ । तालुक्यात साकेगाव- कंडारी, कुर्हे- वराडसीम, वरणगाव- फुलगाव आणि हतनूर-तळवेल असे चार गट होते. त्यापैकी वरणगावला नगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे वरणगाव – फुलगाव गट कमी झाला आहे. त्यामुळे आता परिषदेचे तीन गट तर पंचायत समितीचे सहा गण आहेत. मात्र यामध्ये गेल्या निवडणूकीची तुलना करता राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक होते. आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात तेव्हाही पंचायत समितीची सत्ता काबीज करण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रसचे तत्कालीन आमदार संजय सावकारे यांनी ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश घेतला होता. त्यांच्यापाठोपाठ येथील राष्ट्रवादीच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी देखील भाजपाच्या गोटात सामील झाले. त्यामुळे तालुक्यातील संपुर्ण राजकीय समिकरण बदलून भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले होते. मात्र यावेळेस आमदार सावकारे यांच्यासमोरील विरोधक वाढले असून आत्तापर्यंत सावकारे समर्थक समजले जाणारे सभापती राजेंद्र चौधरी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी भाजपा उमेदवार पाडण्याची भुमिका जाहीर केली असल्यामुळे भाजपाच्या गोटातच दुफळी माजल्याचे दिसून येते. तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या जनाधार पार्टीच्या अडचणी वाढल्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेस तर काहींना शिवसेनेकडून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पालिका निवडणूकीप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत देखील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे माजी आमदार संतोष चौधरींसाठी काम करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही चौधरींचा व्यूह आमदार सावकारे कसा भेदता याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
राजेंद्र चौधरींचे टिकीट कट केल्याने नाराजी
राजेंद्र चौधरी हे हतनूर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र आमदार सावकारे यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश घेतल्याने राजेंद्र चौधरी यांनी देखील सावकारेंच्या पाठोपाठ भाजपात दाखल झाले. त्यामुळे साहजिकच पंचायत समितीवर भाजपाचा शिक्का बसला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असताना देखील राजेंद्र चौधरी यांना सभापती पदासाठी संघर्ष करावा लागला होता. मात्र त्यांना शेवटच्या वर्षात संधी मिळाली होती. हतनूर गण आरक्षित झाल्यामुळे सभापती राजेंद्र चौधरी यांनी कुर्हे पानाचे गणातून भाजपाकडून
उमेदवारी मागितली होती. आमदार सावकारे यांनी संमती देऊन त्यांना अर्ज भरायला सांगितले. मात्र ऐनवेळी स्थानिकांचा मुद्दा उपस्थित होऊन चौधरी यांना उमेदवारी न देता ती सुनिल महाजन यांना देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या राजेंद्र चौधरी यांनी सभापती दालनातील आमदार सावकारेंची प्रतिमा हटविली. व त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावली. यानंतर त्यांनी आमदारांनाच खुले आव्हान दिले आहे. व भाजपाचे सर्व उमेदवार पाडण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.
कुर्हे- वराडसीम जिल्हा परिषद गटात आमदार संजय सावकारे यांच्या वहिणी पल्लवी सावकारे यांना अनुसुचित जाती जागेसाठी उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आमदारांसाठी या गटातील लढत हि प्रतिष्ठेची मानली जात असून याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या गटात भाजपाकडून पल्लवी प्रमोद सावकारे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर कुर्हे येथील संगीता सपकाळे राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडून भाग्यश्री तायडे, वराडसीम येथील भारती पचेरवाल यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. यामध्ये गावातील आणि बाहेरील हा मुद्दा रंगणार असल्याचे दिसून येते. या गटात मराठा समाजाचे प्राबल्य असून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार हे आमदार सावकारे समर्थक असल्यामुळे त्यांचा फायदा भाजपाला होऊ शकतो.
माजी आमदारांनी राष्ट्रवादी व सेनेला घेतले हाताशी?
भाजपाकडे दिल्लीपासून ते शहरापर्यंत सत्ता आली आता ती सत्तागल्लीपर्यंत मिळविण्यासाठी पदाधिकार्यांनी कंबर कसली आहे. मात्र अंतर्गत धुसफुस लक्षात घेता ही निवडणूक भाजपासाठी मोठी कसोटीच ठरणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, येथेही त्यांचे न जमल्याने त्यांनी शिवसेनेलाही जय महाराष्ट्र करीत जनाधार विकास पार्टीची कपबशी हाती घेऊन नगरपालिका निवडणूकीत आपले उमेदवार रिंगणात उतरविले. त्यानंतर जनाधार पार्टीच्या संस्थापक अध्यक्षांनीच भुसावळ तालुका अध्यक्षांचे अधिकार काढून घेतल्याने माजी आमदार चौधरींनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपला मोर्चा वळवून निवडणूकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर आपले उमेदवार दिले आहेत. तर कुर्हे गटात चौधरी समर्थक असलेले बाजार समिती सभापती सोपान भारंबे हे शिवसेनेकडून लढत आहे. यावरुन माजी आमदारांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी धरुन ज्या त्या गटातील राजकीय समीकरणानुसार आपल्या समर्थकांना उभे केले असल्याचे दिसून येते.
सर्व गणांमध्ये उमेदवारांची लढत होणार रंगतदार
तळवेल गणात काँग्रेस पक्षाकडून शैलेश बोदडे, अपक्ष उमेदवार उल्हास भारसके, प्रा. उत्तम सुरवाडे, शिवसेना उमेदवार विजय सुरवाडे, भाजपाचे सुधाकर सुरवाडे, अपक्ष शैलेंद्र सोनवणे असा सामना रंगत आहे. यामध्ये भाजपाचे भारसके आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुक प्रा. सुरवाडे यांनी बंडखोरी करुन उमेदवारी लढविली आहे. वराडसीम गणात राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील व भाजपाच्या विद्यमान सदस्या मनीषा पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवार एकाच गावातील म्हणजेच सुनसगाव येथील आहेत. यामध्ये मनिषा पाटील या मागील वेळेस केवळ तीन मतांनी विजयी झाल्या होत्या. यावेळी मात्र त्यांना राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील यांच्याशी काट्याची टक्कर होणार आहे. कुर्हे गणात – ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील हे राष्ट्रवादीतर्फे बाजार समिती सभापती सोपान भारंबे हे शिवसेनेतर्फे तर भाजपाकडून सुनिल महाजन असा तिरंगी सामना होत आहे. तर कंडारी गणात – भाजपच्या चेतना झोपे, राष्ट्रवादीतर्फे पंचायत समिती सदस्य संतोष निसाळकर यांच्या पत्नी आशा निसाळकर यांच्यात लढत आहे. हतनूर गणात – भाजपाच्या वंदना उन्हाळे, काँग्रेसच्या अलका भिल शिवसेनेचे संतोष सोनवणे व अपक्ष उमेदवार सुनिल पवार यांच्या सामना होईल.
हतनूर- तळवेल गटात तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेकडून सरला कोळी, काँग्रेसकडून अन्नपुर्णा पाटील, भाजपाकडून प्रज्ञा सपकाळे रिंगणात आहेत. या गटातील लढत चुरशीची होईल. दरम्यान सभापती राजेंद्र चौधरी यांचे या गटात विशेष प्राबल्य आहे. मात्र चौधरी यांना कुर्हे गटातून भाजपाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी भाजपाचे उमेदार पाडण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे सभापती चौधरी यांची खेळी याठिकाणी काम करते किंवा नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
– चेतन चौधरी
7767012203