भुसावळात माजी आमदार संतोष चौधरींची नवीन इनिंग

0

सकाळी 10.10 मिनिटांनी उपोषण ; पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत

भुसावळ (गणेश वाघ)- कधी काळी शिवसेनेत असल्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आलेले व सेनेच्याच तिकीटावर नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या माजी आमदार संतोष चौधरींना आमदारकीचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत दिलीप भोळे यांच्यापुढे आव्हान उभे केले होेते मात्र पहिल्यांदा त्यांचा दारूण पराभव झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची त्यांनी वाट धरली होती. त्यानंतर ते आमदार म्हणून निवडूनही आले व त्यांनी त्यावेळी दिलीप भोळे यांचा पराभव केला होता. आमदारकीनंतर भुसावळ मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांनी आपले स्वीय सहाय्यक संजय सावकारे यांना स्वच्छ चेहरा म्हणून पुढे करीत निवडूनही आणले. या दरम्यानच्या त्यांच्यावर काही प्रकरणात आरोप झाल्याने ते विजनवासात होते. राष्ट्रवादीने सहकार्य न केल्याची त्यांची भावना असल्याने शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधले मात्र ते शिवसेनेत फारसे रमले नाहीत तर पालिका निवडणूक त्यांनी जनआधार विकास पार्टीतर्फे लढत तब्बल 18 नगरसेवकांना विजयी केले होते. निवडणुकीनंतर सुमारे दिड वर्ष अलिप्त असलेल्या चौधरींनी पालिकेच्या राजकारणात पुन्हा षड्डू ठोकले आहेत.

चौधरींच्या नव्या इनिंगने अनेकांच्या वाढल्या अडचणी
मध्यंतरी माजी आमदार चौधरींवर विविध प्रकरणांबाबतीत आरोप झाल्याने ते अडचणीत सापडले होते शिवाय विरोधकांनी एकीकडे करीत त्यांना एकटदेखील पाडले मात्र तब्बल दिड वर्षानंतर सक्रिय झालेल्या चौधरींनी पालिकेच्या राजकारणात पुन्हा उडीत घेतली आहे. भाजपा सत्ताधार्‍यांना जेरीस आणत अनेक गैरव्यवहारांवर बोट ठेवायला त्यांनी सुरुवात केली असून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चौधरींची नवीन इनिंग बरेच काही सांगणारी आहे. भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांच्या अटकेसाठी गुरुवारी सकाळी 10.10 मिनिटांनी त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सुरू केलेले उपोषण अर्थात ते पुन्हा राष्ट्रवादीच्या असल्याचे संकेत आहेत. वर्षभरावर विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे त्यांच्या हालचाली या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत शिवाय चौधरी हे रावेर लोकसभेसाठी इच्छूक असल्याचीदेखील चर्चा आहे. ज्या विरोधकांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला त्या विरोधकांविरोधात त्यांनी षड्डू ठोकले आहेत. विरोधकांच्या अस्त्राचा वापर चौधरी करीत असून एकटेच दांडपट्टा फिरवत आहेत. भुसावळचे आगामी राजकारण आगामी काळात कुठल्या वळणावर पोहोचेल ? हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.