भुसावळ- शहरातील महात्मा फुले नगरात अज्ञात माथेफिरून दोन रीक्षा पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना सोमवारी मध्यरात्रऋी घडली. या प्रकाराने बँजो वादक दीपक पुंजो सोनवणे यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. महात्मा फुले नगरातील दीपक पुंजो सोनवणे (45) व त्यांचा भाऊ उध्दव पुंजो सोनवणे रीक्षा चालकाचा व्यवसाय करतात. दीपक यांच्या मालकीच्या रीक्षा (एम.एच. 19 व्ही. 1793) व (एम.एच. 19 सी.एम. 0854) या घरासमोर लावून ठेवल्या असतानाच सोमवारी पहाटे एक ते सव्वा वाजेच्या दरम्यान सर्व सोनवणे परीवार घरात झोपला असतानाच अज्ञात माथेफिरुने दोन्ही रीक्षांना आग लावली. रात्री घराशेजारी राहणार्या इसमाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सोनवणे यांना दिल्यानंतर सोनवणेंसोबत रमेश डागोरे, विलास चौधरी, हर्षल कांबळे आदींनी रीक्षांवर पाणी टाकून आग विझविण्यासाठी मदत केली मात्र तोपर्यंत दोन्ही रीक्षा जळाल्या. या घटनेतील तब्बल तीन लाख रुपयांचे नुकसान झाले . शहर पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दीपक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात माथेफिरुविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रीक्षा हे उत्पन्नाचे साधन
सोनवणे भावंडांच्या संसाराचा गाडा या दोन्ही रीक्षांमुळे ओढला जातो. त्यांच्या परीवाराचे रीक्षा हेच उत्पन्नाचे साधन होते. दोन्ही रीक्षा अज्ञात माथेफिरुने पेटवल्यामुळे सकाळी सोनवणे परीवारातील महिला व मुलींनी हंबरडा फोडला. अज्ञात माथेफिरुचा तत्काळ शोध घेवून कारवाई व्हावी, अशी मागणी सोनवणे परीवारासह परिसरातील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री लोको पायलट किशोर भालचंद्र भारंबे यांच्या घराच्या आवारात उभी असलेल्या कारच्या काचा अज्ञात माथेफिरुंनी फोडून दहशत निर्माण केली होती. या घटनेला चार दिवस पूर्ण होत नाही, तोच पून्हा महात्मा फुले नगरात ही घटना घडल्याने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.