थर्ड पार्टीच्या अहवालानंतर रस्ता कामाचे बिल अदा करण्याची मुख्याधिकार्यांची ग्वाही ; स्वच्छता ठेेकेदाराच्या मनमानीमुळे ठेका रद्द करण्याची मागणी : थर्ड पार्टीच्या अहवालानंतर रस्ता कामाचे बिल अदा करण्याची मुख्याधिकार्यांची ग्वाही ; स्वच्छता ठेेकेदाराच्या मनमानीमुळे ठेका रद्द करण्याची मागणी ;भुसावळ पालिकेच्या सभेत जनआधार विकास पार्टीचे नगरसेवक आक्रमक ; अर्ध्या तासात शहर विकासाच्या 34 विषयांना मंजुरी
भुसावळ- लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल अडीच महिने लांबलेली पालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार, 11 रोजी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात झाली मात्र सभेच्या सुरुवातीपासून विरोधकांनी आक्रमक होत मामाजी टॉकीज रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत तक्रारी केल्याने दोषी ठेकेदारावर काय कारवाई केली? याचे आधी उत्तर द्यावे मगच सभेचे कामकाज सुरू करावे? अशी आक्रमक भूमिका घेत सत्ताधार्यांची कोंडी केली. सभा संपल्यानंतर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देवू, अशी भूमिका नगराध्यक्षांनी मांडली मात्र या प्रकारावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच तु तु मैं मै झाली तर पाणीप्रश्नावरून विरोधी नगरसेवकांनी सत्ताधार्यांना घेरल्याने दोन वेळा सत्ताधार्यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभागृहाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर सत्ताधारी नगरसेवकांना सर्व विषयांचे वाचन करण्याची भूमिका मांडल्यानंतर वादावर पडदा पडला.
निकृष्ट कामामुळे विरोधक आक्रमक
मंगळवारी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. नगरसेवक युवराज लोणारी यांनी माजी नगरसेविका सुशीला सुरवाडे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडल्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली. अजेंड्याचे वाचन सुरू असतानाच विरोधी नगरसेवक व जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर यांनी मामाजी टॉकीज रस्त्याबाबत यापूर्वी तक्रारी केल्याने काय दखल घेतली, दोषी ठेकेदारावर का गुन्हा दाखल केला नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करीत किती मलिदा खाल्ला? असा खळबळजनक आरोप करीत नगराध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी नगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी शहरात पाणीप्रश्न बिकट झाला असून विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने सत्ताधारी काय करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी व विरोधक बोलू लागल्याने अधिकच गोंधळ वाढला. नगराध्यक्षांनी विरोधकांनी शांततेचे आवाहन करीत बेछूट आरोप करू नये, असे सांगत प्रश्नांची उत्तरे देतो मात्र एक-एक जण बोला, खाली बसा, असे आवाहन केले. यावेळी उल्हास पगारे यांनी आम्ही खाली बसतो मात्र आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या नाही तर आम्ही तुम्हाला उघडे पाडू, रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही दिला.
कोलते-पगारेंमध्ये शाब्दीक वाद विकोपाला गेला
पाणीप्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले असतानाच नगरसेवक किरण कोलते यांनी वादात उडी घेतल्याने उभयंतांमध्ये चांगलीच तु तु मैं मै झाली. यावेळी नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र वाद इतका विकोपाला गेला की आठ मिनिटात सत्ताधार्यांनी सर्व विषयांना मंजुरी दिली मात्र सर्व विषयांचे वाचन करण्याचे पुन्हा ठरल्याने सत्ताधारी बाकावर बसले मात्र त्यानंतरही विरोधक ऐकण्यास तयार नसल्याने युवराज लोणारी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले तर 11.30 वाजता पुन्हा सत्ताधार्यांनी सर्व विषय मंजूर म्हणत पुन्हा सभागृहाबाहेर पडण्याची तयारी केली मात्र विरोधक खाली बसल्याने पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाले.
नगराध्याक्षांच्या खुलाशानंतर वादावर पडदा
मामाजी टॉकीज रस्त्याचे काम निकृष्ट झाले नसून श्री विसर्जन व देवी विसर्जन मिरवणुकीसाठी नागरीकांनी स्वतःहून रस्ता खुला केल्याने रस्त्याची काहीशी दुरवस्था झाली मात्र ठेकेदाराने आता काम पूर्ण केले असल्याचा खुलासा नगराध्यक्ष रमण भोळे यांनी करीत संबंधित ठेकेदाराचे पूर्णपणे बिल निघाले नसल्याचे सांगत कोणतेही जादा शुल्क न घेता आता या रस्त्याचे क्युरींगचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले तर मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले की, त्रयस्थ कमेटी रस्ता कामाचे परीक्षण केल्यानंतर अहवाल सादर करेल व त्यानंतरच ठेकेदाराचे बिल अदा होईल, वाटल्यास विरोधकांनी एखादी चांगली एजन्सी सूचवावी, असा खुलासा मुख्याधिकार्यांनी केल्यानंतर वादावर पडदा पडला.
कचरा संकलनाचा ठेका रद्द करा -लोणारी
पालिकेचा कचरा संकलन ठेकेदार संतोष ठाकूर हा फोन घेत नाही, गावात स्वच्छता होत नाही, असा आरोप सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारी यांनी करीत दोषी ठाकूर यांचे बिल तातडीने थांबवून त्यांचा ठेका रद्द करावा, अशी भूमिका लोणारी यांनी मांडली. या संदर्भात मुख्याधिकार्यांकडे तक्रार केल्याचे सांगत त्यांनी मक्तेदार जागेवर नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला. मुख्याधिकार्यांनी या संदर्भात कारवाईचे आश्वासन दिले तसेच मक्तेदाराची बिले नियमानुसार काढली जात असून ज्यांना शंका वाटत असल्यास त्यांनी आपल्या कार्यालयात येवून तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
अमृतच्या दुसर्या टप्प्याचा प्रस्ताव मंजुर करावा -प्रा.नेवे
नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी अमृत योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पाईप लाईनसाठी अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांची डागडूजी करण्यासह दुसर्या टप्प्यातील भूयारी गटारींसाठी अनुदान प्राप्तीचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी सभागृहात केली. यावर सर्व नगरसेवकांनी त्यास मंजुरी दिली.
दफनविधीच्या मानधनावरून नगराध्यक्षांनी लोणारींचे ‘टोचले कान’
बेवारस प्रेतांवर दफनविधी करण्यासाठी पालिकेकडून 251 रुपये प्रती माणसी दिले जातात मात्र महागाईच्या काळात हा निधी अल्प असल्याने तो वाढवण्याचा प्रस्ताव सभागृहापुढे नगराध्यक्षांनी मांडल्यानंतर सर्वांनी त्यास मंजुरी दिली. यावेळी लोणारी यांनी नेमके किती मानधन वाढवणार? असा प्रश्न केल्यावर नगराध्यक्षांनी लोणांनी तुम्ही खरे राष्ट्रवादीत सत्तेत असताना हा प्रश्न सोडवायला हवा होता, असे सांगून सभागृहात लोणारींचे कान टोचले. या प्रकाराने उपस्थित नगरसेवकही अवाक् झाले.
अर्ध्या तासात शहर विकासाच्या विषयांना मंजुरी
सभागृहात 33 विषयांसह आयत्या वेळी आलेल्या विषयाला धरून 34 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात पालिका रुग्णालयात शवविच्छेदन कक्षाची दुरुस्ती करणे, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, झाडांसाठी ट्री गाडृ खरेदी करणे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय न बांधलेल्या लाभार्थींकडून अनुदान परत घेणे, शहरातील नाल्यांची स्वच्छता करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह पाण्याची नासाडी करणार्यांवर कारवाई करणे, जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या निवासाची दुरुस्ती करणे, शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसह विविध प्रभागात शौचालयांची उभारणी करणे आदी विषयांना सभागृहात मंजुरी मिळाली.