शाखा व्यवस्थापकासह तिघा कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा ; बनावट चावीने तिजोरी उघडली
भुसावळ- शहरातील गायत्री नगरातील एल अॅण्ड टी मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून तब्बल 19 लाख 29 हजार 980 रुपयांच्या रोकडवर डल्ला मारण्यात आला असून बनावट चावीने तिजोरी उघडून ही रक्कम लांबवण्यात आली. ही घटना 8 ते 10 जून दरम्यान घडली. ही चोरी भुसावळचे शाखा व्यवस्थापक राहुल प्रकाश सोमवंशी यांच्यासह कर्मचारी हाशीम अली व अमर वाघ यांनी केल्याचा संशय विभागीय व्यवस्थापकांनी व्यक्त केल्यावरून तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
शाखा व्यवस्थापकासह तिघांवर संशय
मायक्रो फायनान्स कंपनीतर्फे शहरासह परीसरातील बचत गटांना वित्त पुरवठा व कर्ज देणे तसेच वसुलीची कामे केली जातात. यानिमित्त दरररोज मोठ्या प्रमाणावर वसुली होवून ती कंपनीच्या कार्यालयातील तिजोरीत ठेवली जाते. भुसावळचे शाखा व्यवस्थापक राहुल सोमवंशी हे सुटीवर असताना कर्मचारी हाशीम अली व अमर वाघ हे रोकड देखभाल तसेच तिजोरीत ठेवण्याचे काम करीत असल्याने तिघांकडे चावी देण्यात आली होती मात्र 10 रोजी सकाळी साडेआठ वाजता कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याने सोमवंशी यांनी एल अॅण्ड टी मायक्रो फायनान्स विभागाचे जळगाव विभागीय व्यवस्थापक नरेंद्र भारतराव पंडित (औरंगाबाद) यांना दूरध्वनी करून 19 लाख 29 हजार 980 रुपयांची रक्कम चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली. बाजारपेठ पोलिसांना घटना कळवल्यानंतर त्यांनीही धाव घेत पाहणी केली. दरम्यान, बनावट चावीने उघडण्यात आली असून 7 व 8 जूनच्या कलेक्शनची रक्कम लांबवण्यात आली व ही चोरी शाखा व्यवस्थापकासह अन्य दोघा कर्मचार्यांनी केल्याचा संशय नरेंद्र पंडित यांनी व्यक्त केल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.