भुसावळात पोलिसांच्या तोकड्या बंदोबस्तामुळे टवाळखोरांना आयतेच मोकळे रान
भुसावळ : बारावी परीक्षेप्रमाणेच भुसावळात दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवसांपासूनच कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र शहरातील अनेक केंद्रावर दिसून आले. तोकड्या बंदोबस्तामुळे टवाळखोरांनी थेट दोन मजले उंच चढत हितचिंतकांना कॉपी पुरवली तर कॉपी बहाद्दरांना कॉपी पुरवणार्यांनी केलेल्या गोंगाटामुळे हुशार विद्यार्थ्यांना नाहक गोंगाटाला सामोरे जावे लागले. शिक्षण विभागाने या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी, अशी अपेक्षा सुज्ञ पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
कॉपीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा
भुसावळातील आठ परीक्षा केद्रावर मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेसाठी शहरातील सेंट अलॉयसीस, म्युन्सीपल हायस्कूल, संत गाडगे महाराज विद्यालय, द.शि.विद्यालय, बियाणी हायस्कूल, बी.झेड.हायस्कूल, पंडित नेहरू विद्यालय, वराडसीम या केंद्राचा समावेश आहे. पहिल्या दिवशी मराठीच्या विषयासाठी तीन हजार 568 विद्यार्थी प्रवीष्ट असलेतरी त्यातील 23 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे सूत्रांनी सांगितले तर कुठेही कॉपी बहाद्दरांविरुद्ध कारवाई झाल्याचे वृत्त नाही.
डी.एस.हायस्कूलमध्ये कॉपीचा कहर
शहरातील डी.एस.हायस्कूलमध्ये मंगळवारी सकाळी मराठी विषयाच्या पेपराला सुरुवात झाल्याने कॉपी पुरवणार्यांनी कहर करीत शाळेला लागून असलेल्या डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातून थेट आपल्या हिचचिंतकांपर्यंत कॉपी पोहोचवली. पहिला ते दुसर्या मजल्यापर्यंत कॉपी पोहोचवली जात असताना पोलिस यंत्रणेकडून मात्र ठोस कारवाई न झाल्याने संबंधिताचे चांगलेच फावले. या प्रकाराला कंटाळल्यानंतर उद्यानाला कुलूप लावण्यात आले मात्र अनेक भाविक मंदिरात अडकल्याने त्यांच्यासाठी कुलूप उघडताच कॉपी बहाद्दरांचे सातत्याने फावल्याचे दिसून आले.
म्युन्सीपलमध्येही चालली कॉपी
जामनेर रोडवरील म्युन्सीपल हायस्कूलच्या पाठीमागील बाजूने मोठ्या प्रमाणावर कॉपी पुरविण्यासाठी युवकांनी गर्दी केली तर जीवाची पर्वा न करता मोठ्या भिंतीवर चढून कॉपी पुरविल्या जात असताना संबंधिताना कुणीही हटकत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून मोठ्या प्रमाणावर कॉपी आत आल्याचे सांगण्यात आले.