भुसावळात मालगाडीचे डबे घसरले : वाहतूक ठप्प

0

अप-डाऊन लाईनीवरील तब्बल 32 रेल्वे गाड्या प्रभावीत : रविवारची सुटी त्यातच गाड्यांना विलंब झाल्याने प्रवासी संतप्त

भुसावळ : रेल्वे यार्डातून निघालेली कंटेनर मालगाडी आरआरआय कॅबीन लगतच्या आरसी कॅबीन जवळ जात असताना गाडीचे तब्बल आठ रेल्वे डबे रूळाखाली उतरल्याची घटना रविवारी सकाळी 6.55 वाजेच्या सुमारास घडल्यानंतर रेल्वे यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. या प्रकारामुळे अप-डाऊन रेल्वे लाईनीवरील तब्बल 32गाड्या प्रभावीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. आधीच रविवारची सुटी व त्यात गाड्यांना गर्दी असताना तब्बल पाच गाड्या रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या तर अन्य पाच गाड्यांना विविध स्थानकावर थांबवून ठेवण्यात आले. अप मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात सकाळी 9.25 वाजता यश आले तर अपघात घडलेल्या डाऊन रेल्वे मार्गावर सकाळी 11.10 वाजता गाडी रवाना करण्यात आली. दरम्यान सुमारे साडेचार तासांपेक्षा अधिक काळ विलंब झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला तर रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांना प्रवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

हुटर वाजताच यंत्रणेची धावळ
रविवारी सकाळी 6.50 वाजेच्या सुमारास न्यू. मुलूंड येथून मंडीदिप येथे जात असलेली कंटेनर मालगाडी भुसावळ रेल्वे यार्डातून निघाल्यानंतर ती यार्डातील आरसी कॅबीनजवळील अप लाईनीवर क्रॉसओव्हरजवळ आल्यानंतर या गाडीचे तब्बल आठ डबे रूळावरून खाली उतरले. याबाबतची सूचना रेल्वे प्रशासनालाच मिळताच अपघाताचा संदेश देणारा हुटर वाचवण्यात आला तर या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. डाऊन लाईनीवरील क्रॉसिंगवर अपघात झाल्यामुळे अप लाईनवरही वाहतूक प्रभावीत झाली. आत्पतकालीन गाडीला पाचारण करण्यात आल्यानंतर वरीष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांनी तातडीने रेल्वे रूळाखाली उतरलेले डबे रूळावर चढविण्यासाठी तात्काळ युध्दपातळीवर कामाला सुरूवात केली.

सहा रेल्वे गाड्या स्थानकावर थांबून
अपघात घडल्याच्या काळी वेळानंतर डाऊन मार्गावर निघालेली 22139 पुणे-अजनी हमसफर एक्स्प्रेस सुमारे एक ते दिड किलोमीटर पुढे निघून गेल्याने तिला पुन्हा माघारी बोलावण्यात आले तर 11057 मुंबई-अमृतसर पठाणकोट, 12811 मुंबई-हटीया एक्स्प्रेस, भुसावळ-बडनेरा मेमू तसेच 12656 नवजीवन एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस तसेच गोवा एक्स्प्रेस,
एक्स्प्रेस या गाड्या रेल्वे स्थानकावर थांबिवण्यात आल्याने प्रवाशांनी गोंधळ घालत तीव्र संताप व्यक्त केला. स्टेशन डायरेक्टर जी.आर. अय्यर, आरपीएफ तसेच लोहमर्गाच्या कर्मचार्‍यांनी प्रवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

विविध स्थानकावर थांबवल्या गाड्या
रेल्वे अपघातामुळे अप मार्गावरील नवजीवन एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस गाडी या गाड्या विविध ठिकाणी थांबविण्यात आल्या तर डाऊन मार्गावरील महाराष्ट्र एक्स्प्रेस,महानगरी एक्स्प्रेस, हैद्राबाद-जयपूर एक्स्प्रेस, पठाणकोट एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस, कटनी पॅसेजर, चेन्नई एक्स्प्रेस, पाटलीपुत्र या गाड्या उशिराने धावल्या. अपघातस्थळी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज सिन्हा यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी थांबून होते.