भुसावळात मित्राच्या अपघाती मृत्यूनंतर वाहने पेटवली ; आरोपीला वाढदिवशीच पडल्या बेड्या

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील खडका चौफुलीवर सन 2019 मध्ये अपघात होवून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संतप्त जमावाने दोन वाहने जाळल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीला वाढदिवशीच पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. शुभम प्रदीप लोहार (रा.हनुमान मंदीर जवळ, उपेंद्रनगर, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

भुसावळात अपघातानंतर पेटवली होती वाहने
वरणगावकडून भुसावळकडे दुचाकी (एम.एच.19 डीजे 7243) ने येत असलेल्या दोघा मित्रांच्या वाहनाला भरधाव टाटा पिकअप (एम.एच.19 सीवाय.3966) ने जोरदार धडक दिल्याने हर्षल गणेश कोळी (20, कोळीवाडा, भुसावळ) हा जागीच ठार झाला तर शुभम लोहार हा जखमी झाला होता. 24 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावासह संशयीत आरोपी शुभम लोहारने भरधाव टाटा झेनॉन पिकअप (एम.एच.19 सीवाय.3966) व वरणगावकडून येणारे टाटा मोबाईल वाहन (एम.एच.19 बी.एम.4533) ला पेटवून दिल्याने महामार्गावर खोळंबला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाढदिवशीच ठोकल्या आरोपीला बेड्या
वाहने पेटवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी शुभम लोहार वाण्टेड असल्याने दोन वेळा पथक नाशिकमध्ये जावून आले मात्र आरोपी गवसला नाही तर पोलिसांनी आरोपीचे फेसबुक खाते तपासल्यानंतर 29 मे रोजी त्याचा वाढदिवस असल्याचे कळाले व खात्यावरील संपर्क क्रमांकाच्या आधारे त्याच्याशी संपर्क साधला. कुरीयर पार्सल आले असल्याचे सांगून आरोपीला बोलावण्यात आले व आरोपी येताच त्यास अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे व नाईक समाधान पाटील आदींनी आरोपीला अटक केली.