36 हजारांचा मुद्देमाल जंपास ; बंद घरातही चोरी
भुसावळ- शहरातील गडकरी नगर भागातील हार्डवेअरसह मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी 36 हजारांचा मुद्देमाल लांबवला तर एका बंद घरातही घरफोडी झाली असून घर मालक बाहेरगावातून आल्यानंतर चोरीचा नेमका ऐवज कळू शकणार आहे. शहरात जुन्या चोर्यांचा तपास थंडबस्त्यात असताना पुन्हा चोर्यांचे सत्र सुरू झाल्याने नागरीकांसह व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली आहे.
गडकरी नगरात दोन दुकाने फोडली
मो.हरीम सिद्दीक कच्ची (36, मोहम्मदी नगर, अलफरान मशिदीजवळ, भुसावळ) यांचे गडकरी नगरात किसान हार्डवेअर दुकान असून त्या शेजारीच शेख रईस अहमद ईकबाल (रामदेव बाबा मंदिराजवळ) यांचे अमन मेडिकल आहे. दोन्ही व्यावसायीकांनी बुधवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर गुरुवारी सकाळी दुकान उघडले असता दोन्ही दुकानांचे कुलूप तुटलेली व सामान अस्ताव्यस्त आढळला. किसान हार्डवेअरमधून 12 हजारांची रोकड तसेच वेल्डिंग रॉड, मेटल टी, मेटल थे्रडर तसेच नळ आदी मिळून 23 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला तर अमन मेडिकलमधून चार हजार 800 रुपयांच्या रोकडसह व्हॅसलिन जार, बाम जार, नेव्हिया क्रीम, रीच क्रीम, बोर्नव्हिटा, कोलगेट, हॉर्लेक्स, हिमालिया बेबी क्रीम असा एकूण 13 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. दुकानामागे राहणार्या गडकरी नगरातील रामनाथ होशीलाल वाघ यांच्या बंद घरातही घरफोडी झाली मात्र घरमालक बाहेरगावी गेल्याने नेमका ऐवज कळू शकला नाही. मो.हरीष सिद्दीक कच्ची यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.