तातडीने मिळवले आगीवर नियंत्रण ; सुदैवाने टळली अप्रिय घटना
भुसावळ- रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्याला (बॉक्सएनएचएल 22091233884) वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. कोळशाच्या डब्यातून धुराचे लोळ दिसू लागताच यार्डातील कर्मचार्यांनी धाव घेत पाण्याचा मारा केल्याने अप्रिय घटना टळली. दरम्यान, शहरात उन्हाचा तडाखा सातत्याने वाढत असून त्यामुळे आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सुदैवाने मालगाडीचा कोळसा भरलेला डबा वेगळा असल्याने अनुचित घटना घडली नाही. धावत्या गाडीत हा प्रकार घडला असता तर कदाचित मोठी दुर्घटना घटण्याची भीती होती.
अचानक लागली कोळशाला आग
भुसावळ रेल्वेच्या यार्डात मालगाडीला जोडण्यात येणारा कोळशाचा डबा तांत्रिक कारणांमुळे उभा करण्यात आला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास या डब्यातून धूराचे लोळ निघू लागलयाचे काम करणार्या कर्मचार्यांना आढळताच त्यांनी तत्काळ अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले. काही वेळात कर्मचार्यांनी अथक परीश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीची माहिती कर्मचार्यांना मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. कोळशाचा डबा यार्डात उभा असल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. चालत्या गाडीत अशी घटना घडली असती तर मोठी हानी होण्याची शक्यता होती.