जुन्या वैमनस्यातून कुविख्यात आरोपीने केली चाकूने हत्या
भुसावळ- जुन्या वादातून शहरातील पंचशील नगरातील 28 वर्षीय युवकावर चाकूचे वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने शहराच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. खुनानंतर आरोपी पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेत आनंद अशोक वाघमारे (28, पंचशील नगर, भुसावळ) या युवकाचा मृत्यू झाला असून रेकॉर्डवरील कुविख्यात आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव (भुसावळ) याने हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.
जुन्या वादातून हत्येचा संशय
जानेवारी 2018 मध्ये वाघमारे याच्या नातेवाईकासोबत संशयीत आरोपी प्रल्हाद सचदेवचा वाद झाला होता. या वादाची खुमखुमी असतानाच रविवारी कुठल्यातरी कारणातून वाघमारे यांने संशयीत आरोपी प्रल्हादला दुचाकीवर येऊन शिवीगाळ केली. त्यातून उभयतांमध्ये भांडण होवून वाद विकोपाला गेला व आरोपीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने वाघमारेवर हल्ला चढवल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी पसार झाला.
आरोपी रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार
या घटनेतील पसार झालेला आरोपी प्रल्हाद सचदेव हा पोलीस दप्तरावरील कुविख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी आरोपीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता मात्र तांत्रिक कारणाने तो रद्द झाल्याची माहिती आहे.
छातीसह पोटावर केले वार
संशयीत आरोपी प्रल्हादने मयत वाघमारे याच्याशी झटापट करताना चाकूसारख्या धारदार शस्त्राने पोटासह छातीवर वार केले. पाच ते सहा वार पोटासह छातीवर झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने वाघमारे याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी शहरातील डॉ.राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात हलवले असता वाघमारे यास मृत घोषित करण्यात आले.
आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना
संशयीत आरोपी प्रल्हाद सचदेवच्या शोधासाठी जिल्हाभरात दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. बाजारपेठच्या डीबी पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.