मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भुसावळात आश्वासन : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणांच्या विकासासाठी 24 कोटींचा प्रस्ताव मंजूर
भुसावळ– भुसावळातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी विशेष बाब म्हणून आठ दिवसात मंजुरी देण्याच्या घोषणेसह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणांच्या (डी.एस.ग्राऊंड) विकासासाठी 24 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी व दीपनगरातील नवीन 660 प्रकल्पात 80 टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या तीन महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केल्या. महाजनादेश यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने अर्थात सायंकाळी सहा वाजता त्यांची सभा सुरू झाली. याप्रसंगी फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टिकेची तोफ टाकत विकासकामांचा आलेख जनतेपुढे मांडला. जळगाव येथील सभा आटोपून भुसावळात महाजनादेश यात्रेचे आगमन झाल्यानंतर जुना सातारा भागात सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळ खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात तसेच भजनी मंडळांच्या सहभागाने मुख्यमंत्र्यांचे वाजत-गाजत सभा स्थळापर्यंत स्वागत करण्यात आले.
दैवत मतदारराजा म्हणून यात्रा -मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यात्रेच्या आयोजनामागील उद्देश सांगताना आमचे दैवत मतदारराजा असल्यानेच त्यांच्या दर्शनासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आल्याचे सांगत राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये आता कुणीही शिल्लक उरले नसल्याची टिका करीत पत्रकार मला ‘यात्रेचा’ खटाटोप कशासाठी? असा प्रश्न विचारतात मात्र भाजपाला यात्रेची परंपरा आहे. विरोधात असताना आम्ही संघर्ष यात्रा काढल्या मात्र आता सत्तेत असल्याने संवाद यात्रा काढत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीची आता जनतेशी नाळ तुटली असून विरोधक अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत मात्र 2004 मध्ये ईव्हीएम आले व त्यानंतर 2014 पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राहिले मग तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? असा प्रश्नही त्यांनी केला. आता यापुढेही 25 वर्ष भाजपाचे सरकार राहणार असून 15 वर्षात विरोधकांनी जी कामे केली नाहीत ती कामे पाच वर्षात दुप्पट करण्यात आल्याचे ते म्हणाले. भाजपा सरकारने देशातील सर्वाधिक मोठी कर्जमाफी केल्याचे सांगून खडसे मंत्री असताना सिंचनाची कामे मार्गी लागली मात्र सत्ता गेल्यानंतर कामांना ब्रेक लागला मात्र गिरीश महाजन मंत्री झाल्यापासून कामे पुन्हा मार्गी लागल्याचे त्यांनी सांगत भुसावळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार गुरूमुख जगवाणी, जिल्हाध्यक्ष संजवी पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, गटनेता मुन्ना तेली, उद्योजक मनोज बियाणी, विजय चौधरी, अजय भोळे, युवराज लोणारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.वसंतराव झारखंडे यांच्यासह अनेकांचा भाजपा प्रवेश
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भुसावळातील डॉ.वसंतराव झारखेडे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, कृउबा सदस्य कैलास महाजन, योगीता शिनगारे, रेखा गुंजाळ, शीतल साळी आदींनी भाजपात प्रवेश केला. प्रसंगी सरपंच परीषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदतीचा धनादेश खडसे, आमदार सावकारे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.सुनील नेवे यांनी केले.
भुसावळात मोठे प्रकल्प यावेत -आमदार सावकारे
आमदार संजय सावकारे यांनी रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांना पाच हजार घरे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करीत वरणगाव-तळवेल उपसा-सिंचन योजनेसाठी 350 कोटी दिल्याने सरकारचे आभार मानत बंदिस्त पाईप लाईनसाठी निधीची मागणी केली. अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने व योजनेतील अटीमुळे डांबरीकरण करता येत नसल्याने जनतेचा लोकप्रतिनिधींविषयी रोष वाढत असून विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी केली. भुसावळ शहरात एमआयडीसी असलीतरी मोठे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारी वाढून युवक वाममार्गाला लागत असल्याची खंत व्यक्त करीत ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा तसेच तालुक्यातील भिलमळी-मांडवेदिगर येथील नागरीकांचा प्रश्न सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली. शहरातील वीज मीटरबाबत सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनामुळे या प्रश्नाबाबतही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असेते मनोगतात म्हणाले.
मुख्यमंत्री साहेब मोठे उद्योग नागपूरात पळवू नका -माजी मंत्री खडसे
माजी मंत्री एकनाथराव खडसे भाषणाला उठताच नागरीकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत ‘आगे बढो’च्या घोषणा दिल्या. खडसे यांनी मनोगतात स्व.गोपीनाथ मुंडे, डॉ.मुरलिमनोहर जोशी, रामनाथ सिंग यांच्या कार्यकाळात काढलेल्या यात्रांचा संदर्भ देत त्या काळच्या यात्रा या सरकारच्या कारभाराविरोधात असल्याचे सांगून आत्ताच्या यात्रांमध्ये फरक असल्याचे सांगितले. त्यावेळी सरकारला नागडे करणे हाच उद्देश होता मात्र आता सरकार केलेल्या कामांसाठी यात्रा काढत असल्याचे सांगून ते म्हणाले की, काही केले असेल तरच जनतेला सांगता येते, असे सांगून मुख्यमंत्र्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सारंगखेडा-सुरवाडे, शेळगाव बॅरेज तसेच मेगा रीजार्च प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गेल्या 50 वर्षात जितका निधी मिळाला नाही तितका भाजपा सरकारच्या काळात निधी मिळाल्याचे सांगून महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डी.एस.ग्राऊंडच्या विकासासाठी 24 कोटींचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. भुसावळातील एमआयडीसीत सुविधा असतानाही मोठा उद्योग नाही, तो यावा यासाठी प्रयत्न करावा, असे खडसे यांनी म्हणतात मुख्यमंत्री मोठे प्रकल्प नागपूरात पळवतात अन्यथा मामाच्या गावाला अमरावतीला नेतात, अशी त्यांनी कोपरखळी मारतात हास्याचे फवारे उडाले. हतनूर धरणातील गाळ काढण्यासह आठ दरवाजांचे बंद असलेले काम सुरू करावे तसेच दीपनगर प्रकल्पात जमिनी गेल्याने 80 टक्के बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
देवेंद्रजी तुमच्यापेक्षा आम्हाला ज्योतीष जास्त समजते -खडसेंचा टोला
खडसे व मुख्यमंत्र्यांमधील सख्य राज्याला ठावूक असल्याने खडसे शुक्रवारच्या सभेत काय बोलणार ? याकडे सार्यांचेच लक्ष होते मात्र खडसेंनी सरकारवर टिका केली नाही मात्र मुख्यमंत्र्यांच्या कामाचे जनतेसमोर कौतुकही केले. महाजनादेश यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कटाक्ष टाकत देवेंद्रजी तुमच्यापेक्षा आम्हाला ज्योतीष जास्त समजते त्यामुळे आजच लिहून ठेवा राज्यात भाजपा सरकारच येणार आहे कारण आता जनतेचा प्रतिसाद पाहून आजच भाजपाचा विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले. यापूर्वी भाजपाच्या दहा जागा होत्या त्या आता 11 होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त करीत विरोधकांना ईव्हीएमवर टिका करू द्या, यात्रेचे स्वागत म्हणजे जनतेचा कौल आपल्यासोबत असल्याचेही ते म्हणाले.