आरएमएस कॉलनीजवळ अपघात ; डंपर चालकाविरुद्ध गुन्हा
भुसावळ- भरधाव राखाड वाहून नेणार्या डंपरने पादचार्याला उडवल्याची घटना शुक्रवारी सकाळी आरएमएस कॉलनीजवळ घडली. अपघातानंतर डंपर चालक पळून जात असताना नागरीकांनी त्यास पकडून बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. आरएमएस कॉलनीतील रहिवासी चंद्रकांत शेकोकार गणपती मंदिरात जात असताना भरधाव डंपर (क्र.एम.एच.04 बी.जी.5431) शेकोकार यांना धडक दिली. अपघातात शेकोकार गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर वाहन सोडून चालक शेनफडू धनगर (रा.यावल) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र नागरीकांनी त्याला पकडून वाहनातच बसवून ठेवले. जखमी शेकोकार यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी रामदास शेकोकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पीआय देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे तपास करत आहेत.
अवैध गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर
घटनेनंतर आरएमएस कॉलनीतील रहिवाशांनी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांच्यासह तहसील कार्यालय गाठून अवैध गौण खनिजाबाबत तहसील प्रशासनाला जाब विचारला. यापूर्वीदेखील अनेक अपघात झाल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. आरएमएस कॉलनीच्या मार्गावर गौणखनिजाची अवैध वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने जात असल्याने रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी समस्या नागरिकांनी प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर आणि तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे मांडली.