भुसावळात राज्यस्तरीय रनर्सला पोलिसांकडून अमानुष मारहाण

0

हातासह पाय केला फ्रॅक्चर : पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे समाजात तीव्र संताप

भुसावळ : भुसावळातील राज्यस्तरीय रनर्स तसेच भुसावळ शहरातील अलायन्स मराठी चर्चचे कार्यशील सभासद डॅनिएल सुरेश पवार उर्फ बॉबी पवार यांना नाहाटा चौफुलीजवळ राज्य राखीव दलासह स्थानिक पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याने त्यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. 24 रोजी सायंकाळी बॉबी पवार हे वाघूर धरणावरून परतत असताना नाहाटा चौफुलीजवळ जमावबंदीचे उल्लंघण केल्याने उभय पोलिसांनी कुठलीही सबब ऐकून न घेता मारहाण केल्याचा आरोप आहे.

ख्रिस्ती समाजबांधवांनी केली नाराजी
घरातील एकमेव कर्ता व्यक्ती असलेला बॉबी पवार यांना झालेल्या मारहाणीचा ख्रिस्ती समाजातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पवार यांनी नियमांचे उल्लंघण केले असलेतरी हात-पाय तुटेपर्यंत करण्यात आलेली मारहाण निश्‍चितच समर्थनीय नाही, असेदेखील समाजबांधवांचा सूर आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पवार हे सकाळी घराबाहेर पडले व सायंकाळी आल्यानंतर नाहाटा चौफुलीजवळ कुठलीही विचारपूस न करता पाच ते सहा जणांना बळाचा प्रयोग करून त्यांच्या हाता-पायांवर काठ्या मारल्याने त्यांच्या पायातून रक्तप्रवाह सुरू झाल्यानंतर पोलिसांनी मारहाण थांबवून निघून जाण्याचे सांगितले. यानंतर कसेबसे पवार हे शहरातील डॉ.तुषार पाटील यांच्या दवाखान्यात पोहोचले व तेथे त्यांच्यावर उपचार करून पाटा बांधण्यात आला असून आता किमान दोन ते तीन महिने त्यांना घरीच बसावे लागणार आहे त्यामुळे कुटुंबापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. पवार हे ताप्ती पब्लीक स्कुलमध्ये स्पोर्ट टिचर आहेत. दरम्यान, कोरोनापेक्षा आता पोलिसांच्या लाठीची दहशत नागरीकांमध्ये पसरली आहे.