भुसावळ (गणेश वाघ) : हेवी वेट नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी अपेक्षेप्रमाणे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सोहळ्यासाठी खडसे समर्थक तथा भाजपाचे सत्ताधारी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका पती व खडसेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते आवर्जून मुंबईत उपस्थित होते शिवाय खडसे यांचे कधी काही असलेले राजकीय विरोधक व माजी आमदार संतोष चौधरी यांनादेखील पक्षाने निमंत्रण दिल्याने तेही उपस्थित होते. खडसेंच्या प्रवेश सोहळ्यात भुसावळातील पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसलातरी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच जळगावात होणार्या भव्य सोहळ्यात अनेक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत मात्र खरी गोची भाजपाच्या पक्ष चिन्हावर निवडून आलेल्या पदाधिकार्यांची आहे. तूर्त ते भाजपात असलेतरी मनाने खडसेंसोबत आहेत व पालिका निवडणुकीच्या तोंडावर ते राजीनामा देतील हेदेखील तेव्हढेच खरे !
मनोमिलनाकडे लागले लक्ष !
माजी आमदार संतोष चौधरी व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील सख्य सर्वांनाच ठावूक आहे मात्र आता खडसेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधल्यानंतर पुढे काय? हा खरा प्रश्न आहे. माजी मंत्री खडसे व चौधरी गटाचे मनोमिलन होणार का? वा आगामी पालिका निवडणूक चौधरी खडसेंच्या नेतृत्वात लढणार का? हा देखील प्रश्न आहे शिवाय त्यावेळी आमदार संजय सावकारे यांची भूमिका कशी असेल? हा देखील प्रश्न आहे तर समविचार पक्षांची आघाडी होणार नाही? याबाबतदेखील शहरवासीयांना उत्सुकता आहे. आमदारांनी मी भाजपातच असल्याचे जाहीर केले आहे तर दुसरीकडे चौधरी यांनी नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्वागत करीत पक्षीय मतभेद होते, वैयक्तिक नाही, खडसेंच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याची सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीची वाढणार ताकद
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राज्यासह भुसावळतही पक्षाची ताकद वाढणार आहे. खडसेे व आमदार सावकारे यांच्या नेतृत्वात भुसावळ पालिकेत गत निवडणुकीत भाजपाची सत्ता आली होती. 25 भाजपा नगरसेवक पक्ष चिन्हावर तर चार अपक्ष नगरसेवक निवडून आल्यानंतर नगराध्यक्षपदी रमण भोळे यांची वर्णी लागली. आता वर्षभराने पालिका निवडणूक असल्याने भाजपाला त्यात मोठा फटका बसेल? असे म्हणणे धाडसाचे ठरेल दुसरी भाजपा, सेना व राष्ट्रवादी असे तीन जिल्हा परीषद सदस्य असून पंचायत समितीत सहा पैकी चार सदस्य भाजपाचे एक सेना व एक राष्ट्रवादीचा सदस्य निवडून आला आहे. भविष्यात येथेदेखील राजकीय समीकरणे बदलू शकतात. शेतकी संघ व कृउबा सध्या राष्ट्रवादीकडे आहे.
आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे माजी आमदार चौधरी व त्यांच्यातच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला असलातरी आगामी काळात आमदार संजय सावकारे यांची भूमिका कशी असेल? हेदेखील पाहणे महत्वाचे ठरेल. 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघाचे आरक्षण मागासवर्गीय राखीव झाल्यानंतर संजय सावकारे यांना माजी आमदार चौधरी यांना तिकीट देत निवडून आणले होते शिवाय त्यानंतर त्यांना 18 महिन्यांसाठी पालकमंत्रीपदही मिळाले होते. त्यावेळी भुसावळात अजित पवार यांची जाहीर सभा होत असताना सावकारे यांना बोलावण्यात आले नाही शिवाय बॅनरवर त्यावेळी त्यांचा फोटो नसल्याने उभयंतांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली व त्यानंतर युवराज लोणारींचाही शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेवून उमेश नेमाडेंना संधी देण्यात आल्यानंतर कलह अधिकच वाढतच गेला याशिवाय आणखी अनेक कारणावरून उभयतांमध्ये बिनसले त्यामुळे आमदार सावकारे यांच्या आगामी भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
तर आमदार शिवसेनेत असते
सावकारे व चौधरींमध्ये बिनसल्यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा आग्रह धरला मात्र सावकारे शरद पवारांवरील विश्वासापोटी त्यास तयार नव्हते. अखेर कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावानंतर सावकारेंसह समर्थक मुंबईत दाखल झाले व त्यावेळी शिवसेना प्रवेशाचाही निर्णय झाला मात्र त्याचवेळी खडसेंनी आमदारांची भेट घेत त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून देतो, असे सांगितले तर भाजपात प्रवेश करणार असाल तर भाजपाचे तिकीट देतो, असे सांगून बळ दिले. खरे तर भुसावळची जागा शिवसेनेची होती व त्याचवेळी युती तुटल्याची घोषणा खडसेंनी केली व त्यानंतर सावकारेंना भुसावळसाठी भाजपाचे तिकीट देण्यात आले व सावकारे खडसेंच्या नेतृत्वात निवडूनही आले.