भुसावळात यावल नाक्याजवळ राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना व जनआधार विकास पार्टीचे आंदोलन : एक कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा
भुसावळ : नगराध्यक्ष, पालिका मुर्दाबाद, नागरीक त्रस्त नगराध्यक्ष मस्त, रेल्वे अतिक्रमणात विस्थापीत झालेल्यांना हक्काचे घर मिळालेच पाहिजे यासह विविध मागण्यांचे फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी करीत काँगे्रस-राष्ट्रवादी-जनआधारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी 2.40 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष तसेच पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींविषयी तीव्र शब्दातील घोषणाबाजीने परीसर दणाणला. आंदोलकांनी साखळी करीत यावल नाक्यावरून चारही बाजूने जाणारी-येणारी वाहतूक रोखल्याने तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी आंदोलकांनी प्रांताधिकारी जो पर्यंत आंदोलनस्थळी येवून निवेदन स्वीकारून समस्या सोडवण्याचे ठोस आश्वासन देत नाही तो पर्यंत रस्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अखेर साडेतीन वाजेच्या सुमारास तहसीलदार दीपक धीवरे आल्यानंतर त्यांना निवेदन दिल्यानंतर चर्चा करण्यात आली तसेच सात दिवसाआत रस्त्यांच्या कामांना सुरुवात न झाल्यासल लोकप्रतिनिधींच्या तोंडाला काळे फासण्यासह तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
या मागण्यांसाठी रास्ता रोको
शहरातील रस्त्यांची दुरवस्था थांबवून वर्दळीच्या रस्त्यांचे सात दिवसांच्या आत डांबरीकरण करावे, अमृत योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची दोषींकडून वसुली करावी शिवाय कोच फॅक्टरीच्या नावाने अतिक्रमण हटवून गोरगरीबांचे संसार उघड्यावर आल्याने अतिक्रमणधारकांना पुन्हा रेल्वेच्या त्याच जागेवर निवारा व दुकाने बांधू द्यावीत, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाहक प्राण गमावावे लागल्याने लोकप्रतिनिधींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सत्ताधारी मस्त, नागरीक त्रस्त -उमेश नेमाडे
प्रसंगी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सत्ताधार्यांचा उल्लेख सुस्त असा करीत नागरीक समस्यांनी त्रस्त असून सत्ताधारी मात्र टक्केवारी लाटण्यात मग्न असल्याचा आरोप केला. घर-घर कचरा संकलन योजना नुसतीच नावाला असून सत्ताधारी कागदोपत्री बिले दाखवून लाटत असल्याचेही ते म्हणाले. अमृत योजनेची केवळ पाईप लाईन अंथरून 40 कोटींच्या कामातून 12 कोटी रुपये सत्ताधार्यांनी खाल्ल्याचा आरोपी त्यांनी केला तसेच 15 दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने सुस्त सत्ताधार्यांच्या कृतीचा निषेध करीत असल्याचे ते म्हणाले.
अल्पसंख्यांकांवर अन्याय -रवींद्र निकम
रवींद्र निकम म्हणाले की, रेल्वे जागेवरील अतिक्रमण हटवून अल्पसंख्यांकांवर अन्याय करण्यात आला आहे. कोच फॅक्टरी येणार असल्याचे सांगून नागरीकांची दिशाभूल करण्यात आल्याचे ते म्हणाले. प्रसंगी गटनेता उल्हास पगारे म्हणाले की, आरपीडी रस्ता हा पालिका हद्दीत येत असतानाही गोरगरीब युवकांची दुकाने तोडण्यात आली तर महिलांपासून बेघर करण्यात आले. सत्ताधारी निष्क्रीय असल्याची तोफ त्यांनी डागली. यावेळी बुटासिंग चितोडीया व दीपक मराठे आदींनी मनोगत व्यक्त केले.
सात दिवसात रस्त्यांची कामे न झाल्यास काळे फासणार -संतोष चौधरी
माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, शहर खड्डेमुक्त होण्यासह अमृत योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास खंडपीठात आपण दाद मागून संबंधिताच्या मालमत्तेवर बोजे बसवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. लोकप्रतिनिधींनी टक्केवारी न घेता रस्त्यांची दर्जेदार कामे करावीत ते शक्य नसेेल तर किमान डागडूजी करावी व तेही जमत नसल्यास आपल्याला सांगावे, आपण कामे करू, असेही ते म्हणाले. यावल रोड, जामनेर रोड, खडका रोड, आरपीडी रोडचे सात दिवसात काम न केल्यास लोकप्रतिनिधींच्या तोंडाला आपण काळे फासणार असून आणखी आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भुसावळकरांना त्रासापासून मुक्ती दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे ते म्हणाले.
रास्ता रोको आंदोलनात सहभाग
माजी आमदार संतोष चौधरी, कृउबा समितीचे सभापती सचिन चौधरी, माजी गराध्यक्ष उमेश नमाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, दीपक मराठे, आशिक खान शेर खान, माजी नगरसेवक ललित मराठे, सतीश घुले, अशोक (आऊं) चौधरी, अनिता खरारे, बुटासिंग चितोडीया, युवराज पाटील, रवींद्र निकम, मुन्ना सोनवणे आदींची उपस्थिती होती.
आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प
मंगळवारी दुपारी 2.40 वाजता सुरू झालेल्या आंदोलनाची दुपारी साडेतीन वाजता सांगता झाली. आंदोलनामुळे आरपीडी रोड, यावल रोड, जळगाव रोड भागातून येणारी व जाणारी तसेच शहरातून येणार्या-जाणार्या वाहनांना थांबवण्यात आल्याने वाहतूक खोळंबल्याने सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले.