भुसावळात रीक्षा दुरुस्तीसाठी पैसे न आणल्याने पत्नीला मारहाण

0

भुुसावळ : रीक्षा दुरुस्तीसाठी पत्नीने पैसे न आणल्याने संतप्त पतीने घरातील साहित्याला आग लावत पत्नीला मारहाण केल्याची घटना शहरातील पंधरा बंगला भागातील लकिभा नगर, झोपडपट्टी भागात गुरुवारी घडली. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका मीनाक्षी निकम व त्यांचे पती प्रकाश निकम यांनी धाव घेत विवाहितेला धीर दिला. या प्रकरणी पतीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीता चेतन तायडे (30, रा.15 बंगला, भुसावळ) या विवाहितेने रीक्षा दुरुस्तीसाठी माहेरून दहा हजार रुपये आणावेत म्हणून पती चेतन तायडे पत्नीला मारहाण करीत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच घरातील टीव्ही, फ्रीज, कपड्यांवर रॉकेल टाकून पत्नीसह घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर महिलेने आरडा ओरड केल्यानंतर माजी नगरसेविका नंदा निकम व प्रकाश निकम यांनी तत्काळ धाव घेवून मदत करीत आग विझविली. याबाबत पत्नीच्या फिर्यादीनुसार आरोपी पती चेतन तायडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस कारवाईनंतर पुन्हा मारहाण
गुरुवारी सकाळी पत्नीला मारहाण केल्यानंतर बाजारपेठ पोलिसात पत्नीने तक्रार दिल्याचा राग आल्यानंतर सायंकाळी आरोपी पतीने पुन्हा पत्नीला मारहाण केल्याने बाजारपेठ पोलिसांना घटना कळवण्यात आल्यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले तर पत्नी मुलांसह माहेरी गेल्याचे सांगण्यात आले.