भुसावळात रेल्वेचे तिकीट विकणार्‍या दलालास अटक

0

भुसावळ । येथील रेल्वे स्थानकावर अवैधरित्या तिकीट विक्रीचा धंदा बोकाळला असून स्थानकावर दलालांचा सुळसुळाट दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळण्यास त्रास सहन करावा लागतो. यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या गुप्त अभियानांतर्गत मंगळवार 16 रोजी अनधिकृतरित्या तिकीट विक्री करतांना एका दलालास अटक करण्यात आली. मुख्य तिकीट निरीक्षक हेमकांत सावकारे, डीवायसीटीआय प्रशांत ठाकुर यांच्या नियंत्रणाखाली अवैधरित्या तिकीट विक्री करणार्या दलालांना पकडण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. अवैधरित्या तिकीट विक्री करणार्‍यांना अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक महेश महाले हे आरक्षण कार्यालयात बंदोबस्ताला असतांना खिडकी क्रमांक 1 ते 4 अशा प्रत्येक खिडकीवर स्लिपर क्लास तात्काळ बुकींग चालू होण्याआधी जवळपास 10.45 वाजेपासून टेहाळणी करण्यात आली.

यादरम्यान खिडकी क्रमांक 4 वर उभ्या असलेल्या पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तिवर शंका आली. 11 वाजता हा व्यक्ती आरक्षण तिकीट घेवून बाहेर आला. त्यादरम्यान पथकाने त्यास अडविले. यावेळी ही व्यक्ती गडबडली. त्याची तपासणी केली असता तात्काळ प्रिमियम तिकीट (पीआरएन नं.) 8415122220, टी.एन.ओ. 11061, स्लिपर क्लास तीन प्रवाशांचे तसेच चार कोरे आरक्षण अर्ज, 430 रुपये रोख रक्कम आणि आधार कार्ड आढळून आले. त्याचे नाव विचारले असता अक्षय विजय मोते (वय 23) असल्याचे सांगितले. यावेळी अधिकार्यांनी खोलात उतरुन माहिती घेतली असता गरजू प्रवाशांना प्रत्येक व्यक्तिमागे 200 ते 300 रुपये जास्तीचे कमिशन घेवून त्यांच्या नावाने रांगेत उभे राहून तिकीट विक्री करीत असल्याची कबुली त्याने दिली.