भुसावळात रेल्वेच्या तत्काळ तिकीटासाठी दलालांचे जाळे

0

लोहमार्गसह रेल्वे सुरक्षा बल व वाणिज्य प्रशासनाची डोळेझाक ; गर्दीचा हंगाम दलालांच्या पथ्थ्यावर

भुसावळ- लग्नसराईमुळे रेल्वेला असलेली तोबा गर्दी पाहता दलाल मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहे. तत्काळ तिकीटांसह आरक्षित प्रवासाची तिकीटे विकणारी दलालांची मोठी टोळी शहरात कार्यरत झाली असून कारवाईची जवाबदारी असलेली यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून असल्याने संताप व आश्‍चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे प्रवासी तास न् तास रांगेत उभे असताना त्यांना तत्काळ तिकीट मिळत नसताना दलालांच्या माणसांना मात्र लागलीच तिकीट उपलब्ध होत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहे. या प्रकाराला रेल्वे कर्मचार्‍यांचे तर खतपाणी नाही ना? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. तिकीट मिळण्यासाठी दोनशे ते तीनशे रुपये रोजंदारीने माणसे उभी केली जात असून लोहमार्ग पोलीस प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बल व विशेष शाखेसह वाणिज्य विभागाने याबाबत दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लग्नसराई दलालांच्या पथ्थ्यावर
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढली आहे मात्र प्रवाशांना तिकिट खिडकीवर लवकर तिकिट मिळत नसल्याने तिकिट खरेदीसाठी प्रवाशांंच्या रांगा दिसून येत आहेत. यासाठी काही प्रवासी तत्काळ तिकिट खरेदीकडे धाव घेत आहेत मात्र याि ठकाणीही त्यांना त्रास सहन करीत रांगेत उभे राहून तिकिटासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबत प्रवाशांनी तिकिट देणार्‍या कर्मचार्‍यास विचारणा केली असता इंटरनेट सेवा हळु चालत असल्याचे कारण सांगितले जाते. या संधीचा फायदा घेवून स्थानकावर सक्रीय झालेले दलाल एका प्रवासी तिकिटासाठी गरजवंत प्रवाशाकडून 300 ते 400 रूपये जादा मोजून घेत आहेेत. यामुळे स्थानकावर प्रवाशांची दिवसाढवळ्या आर्थिक लूट सुरू आहे. मात्र या प्रकाराकडे रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने दलालांचे चांगलेच फावले आहे.

तिकिट वेडींग मशिनही नावालाच
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी तिकिट वेंडीग मशिन बसवले आहे मात्र गर्दीच्या प्रसंगी तिकिट वेंडीग मशीन यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने प्रवाशांना तिकिटासाठी तिकिट खिडकीवर रांगेत उभे रहावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक त्रास पँसेजरने प्रवास करणार्‍या प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे तिकिट वेंडींग मशीन केवळ नावालाच असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. याचीही रेल्वे प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे.

कारवाई नंतरही दलाल सक्रीय
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ तिकिट खिडकीवर सक्रीय झालेल्या दलालावर कारवाई केली जाते. इतकेच नव्हेतर स्थानकावरील बारीक हालचाली व संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. शिवाय प्रवाशांची याबाबत ओरड वाढताच मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकिट खिडकी जवळ पोलीस सक्रीय केले होते. मात्र या प्रकाराला न जुमानता दलाल पुन्हा सक्रीय झाले असून प्रवाशांची चांगलीच लुबाडणूक करीत आहेत. प्रवासाचे आरक्षित तिकीट देताना संबंधिताची ओळ आधी पटवावी व नंतर तिकीट द्यावे, असा सूरही प्रवाशांमधून उमटत आहेत.

दलाल आणि कर्मचार्‍यांचे संगनमत ?
तत्काळ तिकिटासाठी प्रवाशांना तास न् तास रांगेत उभे राहूनही तिकिट मिळत नाही मात्र स्थानकावर सक्रीय झालेल्या दलालांना कर्मचार्‍यांच्या संगनमताने सहज तत्काळ तिकिट मिळत असल्याची प्रवाशांची ओरड आहे. मात्र प्रवाशांना प्रवासाची लगबग असल्याने शिवाय नाहकचा त्रास नको म्हणून ते या प्रकाराची तक्रार करण्यास टाळत असल्याचे दिसून येते. यामूळे रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

दलालांना रोखण्यासाठी कारवाई करणार- डीआरएम
भुसावळ रेल्वे स्थानकावर दलाल सक्रिय झाले असल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेने तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात येतील, असे डीआरएम आर.के.यादव म्हणाले. रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्या माध्यमातूनही दलाल शोधले जातील, असेही त्यांनी सांगितले. दलालांना कुणी रेल्वे कर्मचारी सहकार्य करीत असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.