उपचार करण्याची सोय मात्र इक्यूपमेंटसह तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव
भुसावळ (गणेश वाघ) : देशभरात कोरोना (कोविड -19) या साथीच्या आजाराने थैमान घातले असून राज्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याने या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात कोरोना विषाणूपासून बचाव व नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या असून वापरात नसलेल्या पॅसेंजरच्या दोन रॅकमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. दरम्यान, असे असलेतरी रेल्वे स्थानिक प्रशासनाकडे आजच्या घडीला इक्यूपमेंटसह तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असून वरीष्ठ स्तरावर या संदर्भात संपर्क साधण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वे मंत्रालयातर्फे अलर्ट
कोरोना आजाराबाबत जागरुक राहण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून देशातील सर्वच रेल्वे स्थानकातील विभागीय व्यवस्थापकांना कळवण्यात आले असून रेल्वे मंत्रालय प्रशासन व मंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकार्यांशी संवाद साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येणार्या सर्वच रेल्वे स्थानकांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ कोरोना आजाराबाबत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
भुसावळ यार्डात आयसोलेशन वॉर्ड
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे यॉर्डात वापरात नसलेल्या पॅसेंजरच्या दोन रॅकद्वारे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. एक बाथरूम एक टॉयलेटही तयार करण्यात आला आहे. रुग्णांसोबत परीचारीका व डॉक्टरांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
रेल्वेकडे इक्यूपमेंटचा अभाव
रेल्वेने आयसोलेशन वॉर्ड तयार केले असलेतरी आजच्या घडीला स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे कोव्हीड 19 वर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच उपचारासाठी लागणारे इक्यूपमेंट नाहीत त्यामुळे ते उपलब्ध करण्यासाठी वरीष्ठ स्तरावर संपर्क साधण्यात येत असल्याचे एडीआरएम मनोज सिन्हा म्हणाले. कर्मचार्यांसाठी केवळ 20 कीट उपलब्ध असून आणखी 300 किट मागवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनचा वापर
रेल्वे रुग्णालयाच्या फरशा, खिडक्या, रेलिंग तसेच रेल्वे स्थानकावर प्रवासी बसण्याच्या जागांवर सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनचा वापर करून दिवसातून किमान पाच ते सहा वेळा साफसफाई व स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़