भुसावळ- भुसावळ येथील रेल्वेचे(चालक) लोको पायलटवर अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज 2 रोजी पहाटे ३-४५ वाजेच्या सुमारास घडली. रेल्वेचे मेल-एक्सप्रेसचे लोको पायलट विनोद कुमार हे आज पहाटे आपल्या निवासस्थानाकडे जात असताना काही अज्ञात गुंडांनी लोको शेड समोर गाठून त्यांच्यावर हल्ला चढविला. या घटनेमुळे रेल्वे कर्मचार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा एनआरएमयु रनिंग स्टाफतर्फे देण्यात आला आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जखमी विनोद कुमार यांना उपचारार्थ भुसावळ रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेच्या ४० बंगला,आगवाली चाळ, हद्दीवाली चाळ व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून अनेक असामाजिक तत्त्व असलेल्यांचा रहिवास रहीवास आहे. या भागातील अतिक्रमण हटविण्यास रेल्वे विभाग उशीर करीत असल्याने असामाजिक तत्त्वांचे बळ वाढले आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे की, २४ तास वेगवेगळ्या शिपमध्ये कार्य करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असून लवकरच अतिक्रमण हटविण्यात येईल. अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत पोलिस विभागाची चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गस्त वाढविण्याबाबत पोलिस विभागाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.