भुसावळात रेशनवर धान्य मिळेना : जळगाव रोड विभागातील 218 परीवार वार्‍यावर

0

शिवसेनेकडून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्यांकडे तक्रार

भुसावळ : जीवनावश्यक वस्तु मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सरकारने जाहीर केले खरे परंतु रेशनवरील हक्काचे धान्यही नागरीकांना मिळत नसल्याने लेकरांना काय खायचे ? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. भुसावळात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची तक्रार रविवारी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

धान्य न मिळाल्याने उडाला गोंधळ
जळगाव रोड परीसरातील श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी, परीसरातील नागरीकांसाठी स्वस्त धान्य दुकान नंबर 12 कडू प्लॉट भागात असून त्यांच्याकडे शहरातील 218 शिधापत्रिका आहेत. एक हजारांपेक्षा जास्त नागरीकांना पुरवठा दुकानातून केला जातो म्हणून नागरीकांनी गर्दी केली, धान्य मिळत नसल्याने गोंधळ निर्माण झाला व नागरीकांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांना घटनास्थळी बोलवले होते.

प्रशासन व दुकानदाराच्या भानगडीत नागरिक अडचणीत
गरीबांना उपाशी राहण्याची वेळ येवू नये म्हणून रेशन सुरू झाले. अंत्योदय आणि शहरी गरीब यांनाच सध्या रेशनवर धान्य मिळतेय. लॉकडाऊनमुळे अनेक कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदाराचे म्हणणे आहे की त्यांना या महिण्याचे फक्त सहा क्विंटल धान्य मिळाले आहे तर दुकानदाराकडे मागील महिन्याचे धान्य शिल्लक असल्याने त्यांना कमी धान्य दिले आहे, प्रशासनाच्या व दुकानदाराच्या भानगडीत नारीरिकांची अडचण वाढली आहे, असे अन्न व पुरवठा मंत्र्यांकडील तक्रारीत प्रा.धीरज पाटील यांनी नमूद केले आहे. सकाळीच प्रा.पाटील यांनी उपविभागीय अधिकारी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्याशी चर्चा केली व नागरीकांच्या समस्या मांडल्या.

पंतप्रधानांच्या आश्‍वासनानंतरही धान्य नाहीच
पंतप्रधानांच्या जाहीर आश्वासनाला सात दिवस पूर्ण झाल्यानंतर सुध्दा येथील लोकांना धान्य मिळालेले नाही. तीन महिन्यासाठी मिळणार्‍या रेशनचे सोडा नेहमीच्या हक्काचेही रेशन आम्हाला मिळत नाही. 80 कोटी लोकांना रेशन देण्याचा वादा करणार्‍या पंतप्रधान मोंदीच्या शब्दाला अधिकार्‍यांनी खोटे पाडू नये, अशी प्रतिक्रिया पंकज इंगळे यांनी दिली. दरम्यान, पंकज इंगळे, पुष्कर वारके, दिनेश बळके, कैलास भोई, संजय भिरुड, छगन ठाकूर, लतिका महाजन, मोहन पाटील, भीमाबाई सावकारे, नितीन काकडे, ज्ञानेश्वर कुंभार, अरुण साळवे, गजानन पवार, प्रल्हाद कुंभार, वसंत पाटील, वासुदेव पाटील, रज्जक गवळी, वसंत तायडे, किशोर बर्‍हाटे, राजेंद्र कुंवर, भारती पाटील, सुनीता पाटील, राहुल चौधरी यांनी आरसीनंबर सहित तक्रार दाखल केली आहे.