24 तासात तपास करून गुन्ह्याचा झाला उलगडा
भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील जामनेर रोडवर भरधाव चारचाकी आदळून चालक गंभीर जखमी झाले तर तीन दुकानांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. पोलिसांनी सुरूवातीला या प्रकरणी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. 24 तासात या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन्ही कारच्या चालकांचा छडा लावला असून त्यांच्याविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तीन दुकानांचे पावणे दोन लाखांचे नुकसान
या प्रकरणी हवालदार मोहम्मद अली सत्तार अली सैय्यद यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून स्कॉर्पिओ (एम.एच.05 सी.एच.9001) वरील चालक अनिल मनवाणी (सिंधी कॉलनी, भुसावळ) व पांढर्या रंगाची आय-20 (एम.एच.19 बी.जे.5419) वरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हा चालक दादर मुंबईचा रहिवास असून त्याचा शोध सुरू आहे तर आरोपींनी कारची शर्यत लावून निष्काळजीपणे व उलट दिशेने वाहन चालवत जामनेर रोडवरील फुटपाथ ओलांडून तीन दुकानांचे सुमारे एक लाख 80 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे नमूद आहे. या अपघातात स्कॉर्पिओमधील अनिल मनवाणी, गौरव लुल्ला, निखिल रत्नानी, संमीत राणे हे जखमी झाले होते. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात आले.