भुसावळात लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीला आजपासून सुरूवात

भुसावळात पोलिस उपअधीक्षकांची पत्रपरीषदेत माहिती : नियमाचे उल्लंघण केल्यास व्यापारी आणि नागरीकांवरही होणार कारवाई

भुसावळ : कोरोना रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोमवारपासून शहरात ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी कठोर करण्यात येणार आहेत. सकाळी सात ते अकरा दरम्यानच अत्यावश्यक सेवा खुली राहणार आहे. त्यात देखील गर्दी करणारे, नियमांचे पालन न करणारे यांच्यावर सोमवारपासून कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान, भुसावळ विभागातही याच पद्धत्तीने जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

रीक्षांमध्ये पडदे लावण्याच्या सूचना
शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परीषदेत माहिती देताना डीवायएसपी वाकचौरे म्हणाले की, भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन असल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक जास्त ऑटोरीक्षा भुसावळ शहरात आहे मात्र ऑटोरीक्षा चालक किंवा एखादा प्रवासी कोरोनाबाधीत झाल्यास त्याचा परीणाम इतर सर्वांवर होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे रीक्षामध्ये रीक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात एक पडदा लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी न केल्यास संबंधित रीक्षा चालकांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सकाळी 11 नंतर आस्थापने सुरू असल्यास सील करणार
लॉकडाउन अंतर्गत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे मात्र 11 वाजेनंतर काही आस्थापने सुरू असतात, तसेच अत्यावश्यक आस्थापनांना व्यतिरिक्त इतरही दुकानदार आपली दुकाने सुरू करत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाणार असून संपूर्ण शहरात गस्त घालून दुपारी 11 नंतर दुकाने सुरू असल्यास हे दुकाने सील केली जाणार आहेत तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांना शासनाने होम डिलिव्हरीची परवानगी दिली आहे, मात्र या ठिकाणी थेट ग्राहक येऊन त्याला माल विक्री केला जात असल्याचे दिसून येत आहे. यापुढे असे दिसून आल्यास ग्राहक आणि हॉटेल चालक या दोघांवर कारवाई केली जाणार आहे तसेच हॉटेल सील केले जाणार असल्याचे डीवायएसपी वाकचौरे यांनी सांगितले.

मॉर्निंग वाकला जाणार्‍यांवर कारवाई होणार
शहरातील तापी नगर तसेच वांजोळा रोड भागात सकाळी आणि सायंकाळी मॉर्निंग वाकला जाणार्‍या नागरीकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या वेळेत नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. लॉक डाऊन अंतर्गत मॉर्निंगवॉकलादेखील निर्बंध घातले असल्याने यासंदर्भात आता गस्त पथक नियुक्त केले आहेत. कुणीही रस्त्याने फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहरातील एन्ट्री पॉइंटवर करणार नाकाबंदी
भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणावर बाहेरून नागरीक येत असतात. त्यामुळे शहराच्या एंट्री पॉईंट वर पाच ठिकाणे नाकाबंदी केली जाणार आहे. याठिकाणी सव्वा अकरा वाजेनंतर हे पॉईंट सक्रिय होऊन शहरात येणार्‍या नागरीकांची चौकशी करतील. यावेळी केवळ आपत्कालीन कारणासाठीच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय कुणीही फिरतांना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. शहरातील रजा टॉवर, जामनेर रोड, गांधी पुतळा, गवळीवाडा, गांधी पुतळा याठिकाणी पथक नियुक्त केले जाणार आहेत.

डेली मार्केटचा परीसर सील करणार
शहरात डेली मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गर्दी होत असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने बाजार विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून डेली मार्केटचा परीसर सील केला जाणार आहे. त्याऐवजी पालिकेने ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी बाजार भरवला जाणार, तसेच अकरा वाजेनंतर फळ विक्री किंवा इतर भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्याने ठेवल्यावर विक्री केल्यास पालिकेचे पथक हे ठेले जप्त करणार असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.