भुसावळ : कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी भुसावळसह जळगाव व अमळनेर शहरात 7 ते 13 दरम्यान जळगाव जिल्हाधिकार्यांनी लॉकडाऊनचे निर्देश दिल्यानंतर पहिल्याच दिवशी भुसावळकरांनी कडकडीत लॉकडाऊन पाळल्याने शहरातील एरव्ही नेहमीच गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. जागोजागी असलेला पोलिस बंदोबस्त पाहून भुसावळकरांनी घरातच थांबणे पसंत केले तर नोकरदारांनी मात्र खबरदारी बाळगत नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य केले. दरम्यान, शहरातील सर्वच व्यावसायीकांनी दुकाने बंद ठेवल्याने सर्वच व्यापारी संकुलांमध्ये निरव शांतता दिसून आली तर नियम न पाळणार्या सुमारे 200 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
200 दुचाकीस्वारांवर कारवाई
मंगळवारी लॉकडाऊनचा पहिलाच दिवस असल्याने काही नागरीक दुचाकीवरून बाहेर पडले मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत दिवसभरात दोनशेवरून अधिक दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. तोंडाला मास्क न लावणे, डबल सीट दुचाकीवरून प्रवास करणे तसेच कागदपत्रे नसणे तसेच विनाकारण बाहेर पडणार्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी दिली.
अपर पोलिस अधीक्षक भुसावळात तळ ठोकून
अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी मंगळवारी शहराला भेट देवून विविध भागांची पाहणी केली तसेच पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाईच्या त्यांनी सूचना करीत पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्याकडून परीस्थितीचा आढावा घेतला.
औषध दुकानांसह दुध डेअरी सुरू
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच व्यावसायीकांनी दुकाने बंद ठेवली होती मात्र अत्यावश्यक सेवा म्हणून औषध दुकानांसह दुध डेअरी ठरवून दिलेल्या वेळेत उघडण्यात आल्या होत्या. शहरातील पेट्रोल पंप सुरू असलेतरी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाच ओळखपत्र पाहून इंधन देण्यात आले तर अन्य नागरीकांना इंधन देण्यास मनाई करण्यात आली.
शहरात 200 पोलिसांचा बंदोबस्त
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात दोनशे पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एसआरपीच्या आठ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत शिवाय शहरात 70 होमगार्डसह शंभर पोलिस मित्रांचीही मदत घेण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणार्यांना पोलिसांकडून सुरुवातीला समज दिली जात असून नियमांचे पालन न करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.