वेल्हाळे गावातील विस्थापिताना प्रकल्पात मिळणार रोजगार ; अन्य मागण्यांबाबतही प्रशासन सकारात्मक
भुसावळ- राखेमुळे विस्थापीत झालेल्या वेल्हाळे गावातील मजुराना प्रकल्पात तातडीने रोजगार द्यावा, वेल्हाटे गावातील सामूहिक वनाधिकार्यांचा दावा वनअधिकार्यांना आदेश देवून तो दावा मंजूर करण्यात यावा, वेल्हाळे येथील जंगलावर व महानिर्मितीच्या प्रकल्पातून पडणार्या राखेवर, पाण्यावर ग्रामसभेचा व संघटनेचा हक्क मंजूर करावा, गावातील मजुरांना शाश्वत रोजगार मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चातर्फे भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गुरूवारी दिवसभर लाक्षणिक धरणे आंदोलन लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याप्रसंगी आंदालकांनी प्रशासन तसेच दीपनगर व आयुष प्रोकॉन प्रा.लि.कंपनीच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
भुसावळातील दीनदयाल नगरातील चौपदरीकरणात विस्थापीत होणार्या घरांच्या नियोजित कस्तुरबा गांधी नगराच्या कामाला गती द्यावी, वेल्हाळेतील गरजूंना आम अधिकार अंतर्गत रेशनकार्ड व धान्य देण्यात यावे, सरकारी जागेवर अतिक्रमण करणार्यांना शासकीय निर्णयानुसार सातबारा उतारा द्यावा आदी मागण्या प्रशासनाला करण्यात आल्या. दीपनगर नवीन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता आव्हाड, आयुष प्रोकॉन प्रा.लि.कंपनीचे काझी यांनी आंदोलकांशी चर्चा केली तसेच कस्तुरबा गांधी नगरात सोयी-सुविधा पुरवण्याबाबत आश्वासन दिले. याप्रसंगी आंदोलकांनी मिरगव्हाण शिवार 95/अ/2 हा गट ही जागा दीनदयाल नगरातील विस्थापीताना देण्याची मागणी केली.
यांचा आंदोलनात सहभाग
लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी, अशोक चावदस तायडे, संदीप पाटील, जितेंद्र सोनवणे, शेख नबी शे.सुभान, विमल सुभाष पाटील यांच्यासह वेल्हाळे गावातील शेकडो स्त्री-पुरूष सहभागी झाले होते.