भुसावळात वन हक्क समितीच्या दाव्यांची पडताळणी खोळंबली

0

पुढील महिन्यात बैठकीचे नियोजन ; लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी घेतली प्रांताधिकार्‍यांची भेट

भुसावळ- विभागातील मुक्ताईनगर,बोदवड आणि भुसावळ या तिन तालुक्यातील अपात्र वनदाव्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी भुसावळ प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी पुढाकार घेतला आहे.यासाठी भुसावळच्या तहसिल कार्यालयात दावे पडताळणी आयोजन करण्यात आले होते.मात्र,पावसाने हजेरी लावल्याने वन दाव्यांची पडताळणी खोळंबल्याने अनेक दावेधारकांना रीकाम्या हाताने माघारी परतावे लागले.

जलदगतीने निपटारा होण्यासाठी वनमित्र समितीचा उपक्रम
भुसावळ विभागातील अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी अधिनियमातंर्गत व वनमित्र मोहीमेतंर्गत वन हक्क समिती,उपविभागीय व जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरवलेल्या प्रलंबीत वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.यासाठी भुसावळ,मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील अपात्र झालेल्या दावेधारकांची प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयाच्या आवारात पडताळणी बैठक घेण्यात आली.बैठकीला प्रभारी तहसिलदार संजय तायडे,वनपाल बी.एन.पवार,लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे चंद्रकांत चौधरी यांचेसह विभागातील तलाठी,ग्रामसेवक,वनरक्षक,ग्रामस्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष,सचिव उपस्थित होते.बैठकीला मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा,चिंचखेडा,डोलारखेडा आदी भागातील अपात्र दावे-प्रतिदावे धारकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.बैठकीला सुरूवातीला प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी मार्गदर्शन करून वनहक्क समितीच्या बाबतीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पावसाने केला खोळंबा
तहसिल कार्यालयाच्या आवारात आयोजित या बैठकीला उपस्थित राहणार्‍यांसाठी वॉटरप्रुफ शामियाना टाकण्यात आला होता.मात्र,प्रांताधिकारी चिंचकर यांचे मार्गदर्शन संपताच पावसाने काही वेळापुरती दमदार हजेरी लावली.यावेळी शामियानावर वॉटरप्रुफसाठी टाकण्यात आलेला बांबू पाण्याच्या वजनाने तुटल्याने सर्व शामियानात पावसाचा शिरकाव झाला.यामूळे बैठक खोळबंली व अपात्र झालेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या पडताळणीसाठी आलेल्या उपस्थितांना रीकाम्या हाताने माघारी जावे लागले.

असे आहेत दावे – प्रतिदावे
अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी अधिनियमातंर्गत व वनमित्र मोहीमेतंर्गत मुक्ताईनगर- 57,बोदवड -173 व भुसावळ तालुक्यातील 10 अपात्र दावे-प्रतिदाव्यांची पडताळणी होणार होती.तसेच बैठकीला अनुपस्थितीत दावे धारकांना नोटीसा बजावल्या जाणार आहेत.

पुन्हा दोन तारखांना बैठक

पावसामूळे खोळबंलेल्या बैठकीमूळे अपात्र झालेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या पडताळणीसाठी उपस्थितांना रीकाम्या हाताने माघारी जावे लागले.यामूळे लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी प्रांताधिकार्‍यांशी चर्चा करून पुढील जूलै महीन्यातील 11 किंवा 18 अशा दोनपैकी एका तारखेला बैठक घेण्याची मागणी केली.त्यानुसार पुन्हा बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

पुर्नपडताळणी होणार
वन हक्क समिती,उपविभागीय व जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरवलेल्या प्रलंबीत अपात्र दावे -प्रतिदावेधारकांना 12(अ)क्रंमाकाचा वनमित्र समितीकडे अर्ज भरून दाखल करावा लागणार आहे.या अर्जाची पुर्नपडताळणी होवून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.तसेच गावांगावांमध्ये जावून पडताळणी होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.