36 हजारांचे साहित्य लंपास ; व्यापार्यांमध्ये भीती
भुसावळ- शहरातील वर्दळीच्या मॉडर्न रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सोना ड्रेसेस व शु कॉर्नर तसेच समाधान जनरल स्टोअर्स या दुकानाच्या छतावरील पत्रे उचकवून अज्ञात चोरट्यांनी 36 हजार 200 रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात चोरटे मुक्कामी असून पोलिस प्रशासन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयश ठरल्याने व्यापारीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वर्दळीच्या रस्त्यावरील दोन दुकाने फोडली
शहरातील प्रल्हाद नगरातील रहिवासी सुरेंद्रकुमार अशोककुमार जैन (47) व सुनील अशोक जैन या बंधूंची मॉडर्न रोडवर सोना ड्रेसेस व शु कॉर्नर तसेच समाधान जनरल स्टोअर्स ही दुकाने असून नेहमीप्रमाणे जैन बंधूंनी 1 रोजी रात्री नऊ वाजता दुकाने बंद केली मात्र 2 रोजी पहाटे साडेसहा वाजता दुकाने उघडल्यानंतर दुकानाच्या छताच्या पत्र्यावरून चोरट्यांनी प्रवेश करीत दुकानातील साहित्य लांबवल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी तीन हजार 500 रुपयांची चिल्लर तसेच पाच हजार रुपये किंमतीच्या नोटा, पाच हजाराच्या जीन्स, दोन हजार 200 रुपयांचे टी शर्ट, एक हजारांचे स्पोर्ट शूज, तीन हजारांचा टॅब, 10 हजार रुपये किंमतीच्या 250 मनगटी घड्याळ, तीन हजार रुपये किंमतीचे मोबाईल पॉवर बँक, दोन हजार रुपये किंमतीचे मेमरी कार्ड, एक हजार 500 रुपये किंमतीच्या कापडी बॅग मिळून रोकडसह एकूण 36 हजार 200 रुपयांचे साहित्य लांबवण्यात आले.