भुसावळात वाढदिवसाच्या दिवशीच मित्राचा खून : आरोपीला अटक

भुसावळ : वाढदिवसाच्या पार्टीला मित्रांमध्ये वाद उफाळल्यानंतर एकाने मित्राच्या डोक्यात लोखंडी पावडा व लाकडी दांडा टाकून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री जामनेर रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिर परीसरात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत सचिन ज्ञानदेव भगत (30, श्रद्धा नगर, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला तर पोलिसांनी या प्रकरणी मुन्ना चौधरी या हद्दपार आरोपीला अटक केली आहे. मयत सचिन याचा गुरुवारी वाढदिवस असल्याने मित्रांसोबत पार्टी करताना वाद वाढल्याने त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव
शुक्रवारी सकाळी जामनेर रोडवर दुकानदारांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले. श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.