वाहनधारकांनी कायदा बसवला बासनात : भुसावळ शहर वाहतूक शाखेकडून धडक मोहिम राबविण्याची गरज
भुसावळ- शहरात चित्र-विचित्र नंबरप्लेट असलेल्या वाहन धारकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कायदा धाब्यावर बसवणार्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेसह तीनही पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़
वाहनधारकांकडून कायदा खिशात
शहर व ग्रामीण भागातील वाहन धारकांनी कायदा खिशात घातला आहे़ पोलीस, प्रेस, दादा, मामा शिवाय विविध नेत्यांची नावे तसेच कुटुंबातील सदस्यांची नावे लिहिलेली नंबरप्लेट तयार करण्यात आली आहे़ राजाश्रयाचा आधार असलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर तर पक्ष चिन्हासह विविध घोषवाक्यही लिहिण्यात आली आहेत तर कायद्याची भीती नसलेल्या काही वाहन धारकांनी वाहनांवर ‘नो रुल्स’ लिहिले आहे़ कायदा पायदळी तुडवणार्यांवर शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़
पोलिसांनी पाळावेत नियम
पोलिसांनी त्यांच्या दुचाकीसह चारचाकीला बेकायदेशीररित्या पोलीस लिहिलेले स्टीकर व लोगो लावल्याने गृहविभागाने 7 सप्टेंबर 2015 रोजी परीपत्रक जारी करून सर्व ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना सूचित केले आहे़ सूचनांचे पालन न करणार्या कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
चारचाकी चालक मोकाट
अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांच्या नंबरप्लेटही नियमबाह्य आहेत शिवाय विविध संघटनांची नावे नियमबाह्यरीत्या टाकण्यात आली आहेत़ अशा वाहन धारकांवरही शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़
कारवाईबाबत कायदा म्हणतो
फॅन्सी नंबरप्लेट-मोटार वाहन कायदा 128 अन्वये शंभर रुपये दंडाची तरतूद होती मात्र नवा कायदा 1988 मधील कलम 200 अन्वये या प्रकारासाठी आता तब्बल एक हजार रुपये दंड आकारला जात आहे.
रेडियम नंबरप्लेट बनवणार्यांवर कारवाई व्हावी
शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत अनेक रेडियम नंबरप्लेट बनवणारे व्यावसायीक आहेत़ पोलिस प्रशासनाने संबंधितांनाच कायद्याचा बडगा दाखवल्यास नंबरप्लेट नियमानुसार तयार केल्या जातील मात्र दुर्दैवाने तसे होत नसल्याने वाहनधारकांचे फावत असल्याचे बोलले जात आहे.