भुसावळात विकासकामांच्या उद्घाटनासाठी 21 रोजी मुख्यमंत्री येणार

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची माहिती ; खासदारांच्या अहवालाचे होणार प्रकाशन

भुसावळ- खासदार रक्षा खडसे यांच्या विकासकामांच्या लेखाजोखा असलेल्या अहवाल प्रकाशनासह शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 21 फेब्रुवारी रोजी भुसावळात येत असल्याची माहिती माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सकाळी त्यांनी शहरातील उद्यानांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून प्रा.सुनील नेवे यांच्या ‘अटल’ निवाससस्थानी पत्रकार परीषद घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन
खडसे म्हणाले की, शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस.ग्राऊंड) गुरुवार, 21 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा होणार असून या कार्यक्रमात खासदार खडसे यांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा असलेल्या अहवालाचे प्रकाशन होईल. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्या हस्ते सोमाणी गार्डनजवळील आणि हनुमान नगरात भुसावळ पालिकेने विकसित केलेल्या ग्रीन स्पेसचे उद्घाटन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते नाहाटा कॉलेजपर्यंत जामनेर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन होणार आहे तसेच या दिवशी होणार्‍या मेहतर समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनासही मुख्यमंत्री हजेरी लावणार असल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान, यापूर्वी अमृत योजनेच्या उद्घाटनासह दीपनगर 660 प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमास न आलेले मुख्यमंत्री 21 रोजी निश्‍चित येतील, असा आशावाद खडसे यांनी व्यक्त केला. पत्रकार परीषदेला नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणी प्रा.सुनील नेवे यांच्यासह नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.