पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे बैठकीत निर्देश
भुसावळ- भुसावळ शहरात विकासकामे निरंतर सुरू ठेवावीत व त्यासाठी लागणारा देण्यासाठी सरकार बांधील असून अटल योजनेचे काम तातडीने पूर्ण करून वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठ्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहातील बैठकीत दिले. या बैठकीला भुसावळचे आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भुषण गगराणी, भुसावळ नगरपरीषदेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदी उपस्थित होते.
90.45 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर
भुसावळ शहराला पाणीपुरवठ्याची शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने अमृत योजनेतून 90.45 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला असून 22 मे 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 26 ऑक्टोबर 2017 रोजी प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेशही देण्यात आले असून प्रकल्पात डब्ल्यूटीपी, पाण्याच्या 11 टाक्या व 213 किलोमीटर परीघात वितरण व्यवस्था ही प्रमुख उपांगे आहेत. आतापर्यंत प्रकल्पाचे 29 टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र पाणीपुरवठ्याच्या स्त्रोताबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्याअनुषंगाने गुरूवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाच्या उर्वरीत कामाबाबत आढावा घेतला. स्त्रोत निश्चितीबाबत तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे तसेच शहराला बारमाही पाणी पुरेल, असा स्त्रोत निश्चित करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.